Shivani Rangole Leg Fracture : मराठी मनोरंजन विश्वातली कलाकार मंडळी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील अपडेट्स शेअर करत असतात. अशातच एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले आहे. ही अभिनेत्री म्हणजे शिवानी रांगोळे
मराठी नाटक, मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली शिवानी सध्या ‘शंकर जयकिशन’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकात तिच्याबरोबर अभिनेते भरत जाधव आणि महेश मांजरेकरसुद्धा आहेत. या नाटकाबद्दलच्या अपडेट्स ती सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसते.
अशातच शिवानीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या पायाला दुखापत झाल्याचे सांगितले आहे. तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. पण पायाला दुखापत झालेली असताना देखील ती नाटकाचे प्रयोग करत आहे. नुकतीच तिनं पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली.
या पोस्टमध्ये ती म्हणते, “नाटक करायला एका पायावर तयार… पायाला दुखापत झाली तेव्हा प्रयोग कसे होणार याचं टेन्शन होतं. पण नाट्यगृहात पाय ठेवण्याच्या क्षणापासून ते मेकअप रूममध्ये मला तयार होताना मदत करणं, नाटकाआधीचा जो प्रॉपर्टी चेक मी करते, तो माझ्या वतीने करून ठेवणं, मला चालायला वेळ लागतो म्हणून ब्लॅकआउटचा अवधी वाढवणं, नाटकात काही हालचाली ऐनवेळी माझ्या सोयीनी बदलणं, नाटक झाल्यावर मला गाडीपर्यंत सुखरूप सोडणं, हे सगळं माझ्या ‘शंकर जयकिशन नाटकाच्या सगळ्या टीमने केलं.”
यापुढे ती म्हणाली, “मला कित्येकदा पायात splinter आहे, याची जाणीवही व्हायची नाही, उत्साहात मी स्टेजवर वावरायचे तेव्हा भरत जाधव आणि महेश मांजरेकर मला आठवण करून द्यायचे. मला सांभाळून घ्यायचे. तेव्हा खूप कृतज्ञता वाटली. स्टेजवर जाईपर्यंत टेन्शन असायचं की, पायामुळे प्रयोग कसा होईल, पण एकदा प्रेक्षकांचा आवाज ऐकला की हुरूप यायचा. आता हळूहळू बरी होत आहे; पण माझ्या टीमसाठी आणि प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात.”
शिवानीने शेअर केलेल्या या पोस्टखाली अनेकांनी तिला काळजी घेण्यास सांगितले आहे. राधिका विद्यासागर, ऋजुता देशमुख, शुभंकर एकबोटेसह अनेक कलाकार आणि चाहत्यांनी तिला काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच तिच्या चाहत्यांनीसुद्धा कमेंट्समधून तिला “लवकर बरी हो”, असं म्हटलं आहे.
दरम्यान, पायाला दुखापत असूनही शिवानी ‘शंकर जयकिशन’ या नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यादरम्यान नाटकाची संपूर्ण टीम तिची काळजी घेत असल्याचे तिने सांगितले आहे.
