दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेता अखिल विश्वनाथचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी निधन झाले आहे. ११ डिसेंबर रोजी या अभिनेत्याने आत्महत्या केली. त्याचा मृतदेह केरळमधील त्याच्या घरी आढळला. त्याच्या निधनाच्या बातमीने त्याचे जवळचे मित्र आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहते सोशल मीडियावर अखिलला श्रद्धांजली वाहत आहेत.

मनोरमा ऑनलाइनने दिलेल्या वृत्तानुसार, अखिल विश्वनाथचा मृतदेह केरळमधील त्याच्या घरातून सापडला आहे. अखिलची आई गीता कामावर जाण्यासाठी तयार होत असताना तिला मुलगा घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला. मुलाचा मृतदेह अशा अवस्थेत पाहून तिला धक्का बसला. अखिलच्या वडिलांचा तीन महिन्यांपूर्वी अपघात झाला होता आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मोबाईलच्या दुकानात काम करत होता अखिल

सध्या अखिल विश्वनाथच्या मृत्यूचे कोणतेही स्पष्ट कारण समोर आलेले नाही. त्याने आत्महत्या केली आणि त्याचा मृतदेह त्याच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. अखिलने असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत चर्चा होत आहेत. अखिल अभिनेता असला तरी, तो त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी एका मोबाईल दुकानात अर्धवेळ काम करत होता. पण तो काही काळापासून या मोबाईल दुकानात येत नव्हता.

अखिल विश्वनाथने अचानक आत्महत्या केल्याने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्याच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अखिलने कोणत्या कारणाने आयुष्य संपवलं, हे अद्याप समजू शकलेलं नाही. चाहते त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

अखिल विश्वनाथचे करिअर

अखिल विश्वनाथ हा त्याच्या ‘चोला’ या चित्रपटासाठी ओळखला जायचा. सनल कुमार ससिधरन दिग्दर्शित या चित्रपटात अखिलने मुख्य भूमिका साकारली होती. हा एक मल्याळम सायकोलॉजिक ड्रामा होता, जो २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याच वर्षी या चित्रपटाला केरळ राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये पुरस्कारही मिळाला. अखिलने बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्याने ‘मंगंडी’ मध्ये काम केलं होतं. त्याचा भाऊ अरुण देखील या चित्रपटात होता. त्यांच्या अभिनयासाठी दोन्ही भावांना राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार मिळाला होता.