बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आपल्या आगामी ‘रॉक ऑन २’ या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात श्रद्धाच्या आवाजातील गाणीसुद्धा प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. आपल्या अभिनयाने बॉलीवूडमध्ये ठसा उमटविण्यामध्ये श्रद्धा कपूरला म्हणावे तेवढे यश मिळाले नसले तरी तिच्या गाण्याचे कौतूक मात्र नक्कीच होत आहे. तिच्या आईलाही तिच्या या गुणाचा अभिमान आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरुन कळतंच.
‘रॉक ऑन २’ या आगामी चित्रपटात श्रद्धाने गायलेल्या गाण्याचे आई शिवांगी कोल्हापूरे यांनी कौतुक केले. शिवांगी यांचे वडील पंढरीनाथ कोल्हापुरे एक प्रसिद्ध गायक आणि वीणावादक होते. त्यामुळे शिवांगी यांना सुर ताल यांच्यातील उत्तम पारख आहे. आईला असणारी पारख आणि आजोबांच्या अंगी असणारा गुण या संगमातून श्रद्धाला गायनाची एक जादूई देणगी मिळाल्याचे दिसते. ‘रॉक ऑन २’ या चित्रपटात श्रद्धा कपूरच्या सुमधूर आवाजातील गाणी ऐकल्यानंतर शिवांगी यांनी आपल्या मुलीचे तोंडभरुन कौतुक केले.
आई आपल्या गाण्याने भारावून गेल्याचे श्रद्धाने एका मुलाखतीत म्हटले आहे. माझी आई चांगली गायक असून ‘रॉक ऑन २’ मधील ‘उड जा रे’ हे गाणे ऐकून तिला आनंद झाल्याचे श्रद्धाने यावेळी सांगितले.
‘रॉक ऑन २’ या चित्रपटात गाण्यासोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अर्जून रामपाल आणि फरहान अख्तर मुख्य भूमिकेत दिसतील. हा चित्रपट ११ नोव्हेबरला प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी ष्रद्धाने गायलेल्या ‘आशिकी २’ चित्रपटातील गाण्यांना लोकप्रियता मिळाली होती.



