प्रेम, लग्न आणि नात्यांकडे हसत-खेळत, पण तितक्याच हळुवारपणे पाहणारं नवं मराठी नाटक ‘श्रीमान श्रीमती’ रंगभूमीवर येत आहे. महालक्ष्मी आणि रंगतसंगत निर्मित, अष्टविनायक प्रकाशित या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे अष्टविनायकचे दिलीप जाधव यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली आनंद काळे यांनी निर्मितीची जबाबदारी उचललेली आहे.
प्रेमात पडणं कदाचित सोपं असेल, पण प्रेमासोबत आयुष्यभर जगायला शिकणं हीच खरी गोष्ट आहे, असा विचार हे नाटक मांडतं. लग्न म्हणजे प्रेमाचा शेवट नव्हे, तर समजूतदारपणा, जुळवून घेणं, संयम आणि सोबतीचा एक सुंदर प्रवास आहे. नाटकाची मांडणी एका बापाच्या नजरेतून केली असून विनोद, रोमान्स, भावना आणि कौटुंबिक नाट्य यांचा सुरेख मेळ त्यात पाहायला मिळतो. दोन पिढ्यांचे विचार, बदलत्या अपेक्षा आणि नात्यांमधले रोजचे प्रसंग हलक्याफुलक्या पद्धतीने समोर येतात, आणि हसवता हसवता प्रेक्षकांना अंतर्मुखही करतात.
नाटकात आनंद काळे, रेशम टिपणीस, धनश्री काडगावकर आणि ऋतुराज फडके हे लोकप्रिय कलाकार एकत्र दिसणार आहेत. अनुभवी आणि ताज्या दमाच्या या कलाकारांची केमिस्ट्री नाटकाचं मोठं आकर्षण ठरेल. कथा-संकल्पना आणि दिग्दर्शन ऋतुराज फडके यांचं असून लेखन अनिल पवार यांनी केलं आहे.
नाटकाची तांत्रिक बाजू अनुभवी हातांत आहे. नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचं, प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची, वेशभूषा भाग्यश्री लेंभे यांची, तर संगीत अनुराग गोडबोले यांचं आहे.
आजच्या काळात लग्न आणि नातेसंबंध हे विषय प्रत्येक घराशी जोडलेले आहेत. त्यामुळे नवविवाहित जोडपी, वर्षानुवर्षं संसार करणारे आणि मुलांचं लग्न पाहणारे पालक अशा सर्वांना हे नाटक आपलंसं वाटेल. नात्यांकडे नव्या नजरेनं पाहायला लावणारा हा अनुभव घेण्यासाठी ३० ऑक्टोबरच्या शुभारंभाच्या प्रयोगाला आवर्जून उपस्थित राहा.
