कमल हासन यांची मुलगी व अभिनेत्री श्रुती हासनने हिने सोशल मीडियावर पोस्ट लिहिल बॉडी शेमिंग करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. दिसण्यावरून सतत काही ना काही टिकाटिप्पणी करणाऱ्यांसाठी ही पोस्ट लिहित असल्याचं तिने स्पष्ट केलं. या पोस्टमध्ये तिने तिच्या प्लास्टिक सर्जरीविषयीसुद्धा सांगितले.

श्रुती हासनची पोस्ट-

माझ्या याआधीच्या पोस्टनंतर मी हे लिहिण्याचा निर्णय घेतलाय आणि का तेसुद्धा सांगेन. माझ्याबद्दल लोकांची काय मतं आहेत याने मला फरक पडत नाही पण सतत काही ना काही कमेंट करणं, आधी किती जाड होती आणि आता किती बारीक झाली हे सर्व दुर्लक्ष करण्यासारखं नाही. हे दोन फोटो मी तीन दिवसांच्या अंतराने काढले आहेत. मला जे म्हणायचं आहे ते काही महिलांना समजू शकेल असा माझा विश्वास आहे.

माझ्या मनावर आणि शरीरावर बऱ्याचदा हार्मोन्सचा प्रभाव असतो आणि गेल्या काही वर्षांपासून मी हार्मोन्सशी जुळवून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. पण हे काही सोपं नाही. त्या वेदना सहन करण्याजोग्या नाहीत, शारीरिक बदल घडणं सोपं नाही. पण माझा प्रवास तुम्हाला सांगणं मला सर्वांत सोपं वाटत आहे. दुसऱ्या व्यक्तीबद्दल मत बनवण्याचा अधिकार कोणालाच नाही आणि मत बनवणं हे अजिबात योग्य नाही. मला या गोष्टीचा आनंद आहे की हे माझं आयुष्य आहे आणि हा माझा चेहरा आहे. होय, मी प्लास्टिक सर्जरी केली आहे आणि त्याची मला लाज वाटत नाही. त्या गोष्टीला मी प्रोत्साहित करतेय का, तर नाही…त्या गोष्टीच्या मी विरोधात आहे का.. तर नाही. मी असंच आयुष्य निवडलं आहे.

आपण स्वत:साठी आणि इतरांसाठी एखादी गोष्ट करू शकतो ती म्हणजे शारीरिक आणि मानसिक बदलांचा स्वीकार करणे. प्रेमाने वागा आणि सहज वागा. मी दररोज स्वत:वर प्रेम करायला शिकतेय आणि माझ्या आयुष्याची प्रेमकहाणी ही माझ्यावरच आहे आणि मला आशा आहे की तुमचीही असेल.

श्रुती हासनने २००९ साली लक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तेव्हा तिची प्लास्टिक सर्जरी झाली होती. या चित्रपटानंतर तिने चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केली. बॉलिवूडसोबतच ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही सक्रिय आहे.