Shruti Haasan on father Kamal Haasan Parenting: दाक्षिणात्य आणि बॉलीवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हासनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिचे बालपण, कौटुंबिक वातावरण आणि वडील कमल हासन यांच्या विचारांबद्दल महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. लहानपणापासूनच वडिलांनी रूढी-परंपरांवर प्रश्न उपस्थित करायला आणि घरातील पुरुषसत्ताक विचारांना आव्हान द्यायला शिकवलं, असे श्रुतीने सांगितलं. ट्विंकल खन्नाशी संवाद साधताना श्रुतीने तिच्या अतरंगी लुक्स, गुलाबी केस, डिमन्स लेन्स आणि टॅटूवर कमल हासन यांनी कशी प्रतिक्रिया दिली, याचा रंजक किस्सा शेअर करत स्वतःला वडिलांची ‘फ्रँकेन्स्टाईन मॉन्स्टर’ असं म्हटलंय.
लहानपणापासूनच वडिलांनी आपल्याला रूढी-परंपरांवर प्रश्न उपस्थित करायला शिकवलं आणि घरातील पुरुषसत्ताक विचारांना आव्हान दिलं, असं श्रुतीने सांगितलं. ट्विंकल खन्नाशी बोलताना श्रुती म्हणाली, “माझी आई सारिका एक स्वतंत्र महिला आहेच, पण पितृसत्ताक समाजात घरातील पुरुषाने महिलांसाठीचे पारंपरिक नियम तोडणं ही खूप मोठी व प्रभावी गोष्ट आहे.”
श्रुती स्वतःला ‘फ्रँकेन्स्टाईन मॉन्स्टर’ का म्हणते?
श्रुतीच्या व्यक्तिमत्त्वावर तिच्या वडिलांच्या विचारांचा इतका प्रभाव पडला आहे की, ती स्वतःला गमतीने ‘फ्रँकेन्स्टाईन मॉन्स्टर’ (एका काल्पनिक कथेतील राक्षस) असं म्हणते. श्रुती म्हणाली, “लहानपणापासून माझे वडील खरोखरच माझे सर्वात मोठे पाठीराखे आहेत आणि म्हणूनच मी त्यांना नेहमी सांगते की मी फ्रँकेन्स्टाईन मॉन्स्टर आहे. कधी एखाद्या गोष्टीवर त्यांचं मत माझ्यापेक्षा वेगळं असलं, की मी त्यांना लगेच सांगते, ‘तुम्हीच मला असं घडवलंय.'”

कमल हासन यांची मुलगी असल्यामुळे तिला काही खास वागणूक मिळाली का? असं ट्विंकल खन्नाने विचारल्यावर ती म्हणाली, “ते माझ्या कामावर सहजासहजी प्रभावित होत नाहीत. तेही इतर सामान्य भारतीय वडिलांसारखेच आहेत.”

आई-वडिलांचं शिक्षण झालं नसल्याने… काय म्हणाली श्रुती हासन?
श्रुती आणि तिची बहीण अक्षरा यांचे संगोपन इतर मुलांपेक्षा खूप वेगळ्या वातावरणात झाले. “माझे आई-वडील दोघेही खूप स्वतंत्र आणि कलात्मक विचारांचे होते. आमच्या घरी सतत सर्जनशीलता आणि एक प्रकारची धावपळ असायची. त्या दोघांचेही शालेय शिक्षण औपचारिक पद्धतीने झालेले नसल्याने मुलांना पारंपरिक पद्धतीने कसं वाढवायचं, याची कल्पना त्यांना नव्हती. आम्ही मोठे होत असताना ते स्वतः पालकत्व शिकत होते,” असं श्रुतीने सांगितलं.

वडिलांनी बंडखोरी करू दिली – श्रुती हासन
श्रुती हासनने तिचे हटके लूक्स, केसांना विविध रंग लावणे आणि रंगीत कॉन्टॅक्ट लेन्स घालणे यावर वडील कमल हासन यांच्या प्रतिक्रियेबद्दल सांगितलं. “मला वाटतं माझे वडील देव माणूस आहेत. बिचाऱ्या माझ्या वडिलांनी मला चेहऱ्यावर भयंकर वाटणाऱ्या लेन्स (डिमन्स लेन्स) आणि गुलाबी केस घालताना पाहिलंय. त्यांनी माझी बंडखोरी जवळून पाहिली आणि तरीही त्यांनी मला ते करू दिलं, हे त्यांचं मोठेपण आहे. आणि त्यांना टॅटू मुळीच आवडत नाहीत, ते त्यांचा तिरस्कार करतात तरीही मला टॅटू करू दिले,” असं श्रुती हासन म्हणाली.
