Shubhankar Ekbote’s Emotional Post For Late Mother Ashwini Ekbote : शुभंकर एकबोटे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मराठीसह त्यानं हिंदीतही काम केलं आहे. २०२५ मध्ये त्याचा ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शित झालेला. यामध्ये त्यानं महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली. शुभंकर सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो आणि त्याच्या दैनंदिन जीवनातील अपडेट्स तो यामार्फत त्याच्या चाहत्यांसह शेअर करत असतो. अशातच शुभंकरनं नुकतीच एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे
शुभंकर व त्याची बायको अभिनेत्री अमृता बने दोघेही सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असतात. परंतु, आता शुभंकरनं त्याच्या आईसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. शुभंकर एकबोटेला त्याची आई लोकप्रिय दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्याकडून अभिनयाचा वारसा मिळाला. अश्विनी एकबोटे यांचं २०१६ मध्ये निधन झालं. त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांतून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, त्यामुळे आज जरी त्या या जगात नसल्या तरीसुद्धा त्यांच्या कामामुळे त्या आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करुन आहेत. आज त्या हयात असत्या तर त्यांनी त्यांचा ५४ वा वाढदिवस साजरा केला असता. २२ मार्च रोजी त्यांचा वाढदिवस असतो. त्यानिमित्त त्यांचा मुलगा शुभंकरनं काही खास फोटो शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शुभंकरची आईसाठी पोस्ट
अभिनेत्यांनं त्याच्या आईबरोबरच्या गोड आठवणी असलेले खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत मोठी कॅप्शन दिली आहे. शुभंकर यामधून लिहितो की, “आज २२ मार्च २०२६, माझ्या अशुआईचा ५४ वा वाढदिवस; वाढदिवसाच्या भरभरून कडकडीत शुभेच्छा अशुआई! आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुझी दोन लेकरं मी आणि अमृता तुला आवडणाऱ्या काही मोजक्या नाट्यगृहांपैकी एक असलेल्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले इथे आपल्या नवीन नाटकाचा प्रयोग सादर करतोय, आम्हा दोघांकडून तुझ्यासाठी वाढदिवसाची ह्यापेक्षा अजून भारी भेट असूच शकत नाही. आजचा प्रयोग तर भारीच करू, आम्ही आमचं १०००००% देऊन करूच. पण, आयुष्यातला प्रत्येक प्रयोग जीव लावून सगळं पणाला लावून करू आशुआई.”
आईबद्दल शुभंकर पुढे म्हणाला, “मी कायम स्वामींकडे, निसर्गाकडे आणि कामाच्या प्रत्येक माध्यमाकडे मनापासून हीच प्रार्थना करतो की माझ्या अशुआईने ज्या हिमतीने, जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने आणि एकाग्रतेने काम केलं; मग ते नृत्य असो किंवा अभिनय त्याच्या १% तरी मला माझ्या आयुष्यात जमूदे. मला पूर्ण विश्वास आणि खात्री आहे की तू होतीसच, आहेसच आणि कायम असशीलच आमच्या बरोबर. तुझी साथ, आशीर्वाद, प्रेम आणि शुभेच्छा आहेत म्हणूनच आम्हाला इतक्या छान चांगल्या नाटकातून सुमीत दादा-चिन्मयी मावशी ह्या दिग्गज लोकांबरोबर रंगभूमीवर काम करायची संधी मिळतेय. माझ्या प्रत्येक प्रयोगाची तुझी पहिल्या रांगेतील एकदम सेंटरची सीट कायम तशीच होती आणि तशीच असेल. बघत राहा मला प्लीज आई नाहीतर मी सुटेन कदाचित प्रेमात पडेन स्वतःच्या, बघत राहा कायम आणि छडी देत जा, योग्य वेळी दोन धपाटे देत जा. तुझ्या नेहमीच्या स्टाईलने मला धडा शिकवत जा; काय बरोबर काय चुकीचं सांगत जा.”
अभिनेता पुढे लिहितो, “माझी अशुआई माझी सगळ्यात पहिली मैत्रीण आणि मित्र आहे. माझी सखी, आज तुझ्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त जेव्हा तू अजूनच तरुण झाली आहेस, आपण आपली ही दोस्ती साजरी करू आणि ‘ही दोस्ती तुटायची नाय’ म्हणत नाचू गाऊ जल्लोष करू! वाढदिवसाच्या शुभेच्छा अशूआई.”
