अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या चौकशीत बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं. अभिनेत्री कंगना रणौतनं याविषयी भाष्य केल्यानंतर ड्रग्ज प्रकरणाचीही चौकशी सुरू झाली. यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलं होतं. तिनेही काही कलाकारांची नावं घेतली होती. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावर अभिनेत्री श्वेता त्रिपाठीनं भूमिका मांडली आहे.

अभिनेत्री श्वेता त्रिपाठीनं एका मुलाखतीत बॉलिवूडविषयी करण्यात येणाऱ्या आरोपांवर टीका केली आहे. श्वेता म्हणाली,”मी विश्वासानं सांगते की, कुणीही आमच्या तोंडात जबरदस्तीनं ड्रग्ज टाकत नाहीये. जर एखाद्या तरुणाला ड्रग्ज घ्यायचे असेल, तर तो कोणत्याही परिस्थितीत घेईल. मग तो मुंबई राहायला असू द्या नाहीतर कोणत्यातरी छोट्या शहरात. याचं मुंबईशी काही घेणंदेणं नाही. त्यामुळे आईवडिलांचं मुलांकडे लक्ष असलं पाहिजे. मुलं योग्य मार्गानं जात आहे ना, यावर त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे,” असं श्वेता म्हणाली.

बॉलिवूडमध्ये काम करताना अभिनेत्रींना तडजोडी कराव्या लागतात, असं बोललं जातं. यालाही श्वेतानं उत्तर दिलं. “अशा प्रकारच्या कथा तयार केल्या जात आहे की, बॉलिवूडमध्ये सगळे ड्रग्ज एडिक्टेड आहेत. अभिनेत्रींना कामासाठी कलाकारांसोबत शय्यासोबत करत आहेत. जोपर्यंत त्या तडजोडी करणार नाहीत, तोपर्यंत त्यांना काम मिळणार नाही. पण, बॉलिवूड अशा पद्धतीनं काम करत नाही. हे सगळं चुकीचं आहे,” असं श्वेता मुलाखतीत म्हटलं आहे.ॉ

अभिनेता सुशांत सिंह प्रकरणात ड्रग्ज सेवनाची घटना पुढे आल्यानंतर अमली पदार्थ विरोधी विभागानं याची चौकशी सुरू केली होती. या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी करण्यात आली. तिला अटकही झाली. मात्र, बॉलिवूडमधील ड्रग्ज सेवनाचा हा मुद्दा संसदेतही गाजला. त्यामुळे त्याच्यावर सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.