‘बिग बॉस १३’चा विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुल्कालाने या जगाचा निरोप घेतला आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे मालिका विश्वावर शोककळा पसरली आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर छोट्या पद्यावरील कलाकारांसह बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. २ सप्टेंबरला सकाळी सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं. हृदय विकाराच्या झटक्यानं सिद्धार्थचं निधन झाल्याची माहिती मुंबईतील कूपर रुग्णालयानं दिली. रुग्णालयात नेण्यापूर्णीच सिद्धार्थचा मृत्यू झाला होता असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं.

गुरुवारी संध्याकाळी कपूर रुग्णालयात सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवाचं पोस्टमॉर्टम पार पडलं. जवळपास ४ तास हे पोस्टमॉर्टम सुरु होतं. ५ डॉक्टरांच्या टीमने हे शवविच्छेदन केलं असून त्याचा व्हिडीओ रेकॉर्डही करण्यात आलाय. तर शुक्रवार म्हणजेच आज ११ वाजता सद्धार्थ शुक्लाचं पार्थिव त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे. आज पोलिसांकडून सिद्धार्थ शुल्काचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट जारी केला जाईल.

हे देखील वाचा: Sidharth Shukla Death: चाहत्यांकडून सिद्धार्थ शुक्लाच्या जुन्या ऑडिशनचा व्हिडीओ व्हायरल

सिद्धार्थ शुक्लाचं पार्थिव आधी जुहू येथील ब्रह्माकुमारी ऑफिसमध्ये नेण्यात येणार आहे. तिथे काही पूजा-विधी पार पडणार आहेत. त्यानंतर त्याचं पार्थिव घरी आणलं जाईल. सिद्धार्थ शुक्लाच्या आई रिता शुक्ला या गेल्या काही वर्षांपासून ब्रह्माकुमारी संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे सिद्धार्थच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. अंतिमदर्शनानंतर आज सिद्धार्थवर अंतिमसंस्कार पार पडणार आहेत.

सिद्धार्थ शुक्लाला ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’ या मालिकांमुळे मोठी लोकप्रियता मिळाली होती. तसचं २०१४ सालामध्ये आलेल्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाया’ सिनेमात तो आलिया भट्टसोबत झळकला होता. तसचं सिद्धार्थने २०१९ साला मधील ‘सूरमा’ चित्रपटात अभिनेता दिलजीत दोसांझ सोबत काम केलं आहे. त्यासोबतच ‘बिग बॉस १३’चं विजेतेपद पटकावतं त्याने लाखो चाहत्यांची मनं जिंकली होती.