Chinmayi Sripada supports Tanushree Dutta in Nana Patekar Matter: नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर रोजी पहाटे गोव्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. अनेक वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या तनुश्री दत्ताने त्यांच्या निधनानंतर ‘दृष्ट व्यक्तीचं निधन’ अशी टिप्पणी केली होती. यावरून तिच्यावर प्रचंड टीका झाली. त्यानंतर गायिका सोना मोहपात्राने तनुश्रीचं समर्थन केलं होतं. आता गायिका चिन्मयी श्रीपाद हिनेही तनुश्रीला पाठिंबा दिला आहे.
सोना महापात्राची पोस्ट
गायिका सोना मोहपात्रा एक्सवर एका पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यामध्ये एका साहाय्यक दिग्दर्शकाने नाना पाटेकरांनी सेटवर लैंगिक गैरवर्तन केले याचा साक्षीदार असल्याचं म्हटलंय. ही घटना ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाची नसून इतर दोन चित्रपटांमधील होती.
पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय?
त्यात लिहिलंय, “त्यावेळी कोणीही काहीही बोलू शकलं नाही, कारण ते अत्यंत हुशारीने एका दृश्यातील अभिनयाच्या नावाखाली लपवून केलं होतं. जसे की ‘हॉर्न ओके प्लीज’च्या डान्स शूटिंगदरम्यान केलं होतं. बऱ्याच वर्षांनंतर सिंटाच्या (CINTAA) एका सदस्याने माझ्याशी संपर्क साधून हे खरंच घडलं होतं का? असं विचारलं. आणि मी हो म्हटलं. या सगळ्यांनतर अखेर त्या अभिनेत्रीला आवाज उठवण्याची हिंमत मिळाली होती.”
“लैंगिक छळाची वृत्ती कायम अशा रितीने लपवली जाते. हे नेहमीच घडतं, आजही घडत आहे आणि दुर्दैवाने ते कधीही थांबणार नाही,” असं या पोस्टच्या शेवटी लिहिलंय. सोनाने ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, “एक साहाय्यक दिग्दर्शक सेटवर झालेल्या कथित लैंगिक गैरवर्तनाचा साक्षीदार असल्याचं सांगतोय. तरीही लोक म्हणतात, ‘तुम्ही एका महिलेवर कसा विश्वास ठेवू शकता?’ पण किती साक्षीदार बोलल्यास तुमचं समाधान होईल? १०? १००? कला म्हणजे निष्पापपणा नाही. दानधर्म करणं म्हणजे चारित्र्य नव्हे. मृत्यू म्हणजे संतत्व नव्हे.”
चिन्मयी श्रीपदा काय म्हणाली?
चिन्मयी ही पोस्ट रिपोस्ट करत म्हणाली, “जे लोक सतत नाना पाटेकरांचं गुणगान गात आहेत, त्यांनी हे मान्य केलं पाहिजे की त्यांनी छळ केला होता आणि हे एकदाच केलं नव्हतं.”
नेमकं प्रकरण काय?
तनुश्रीने आरोप केला होता की, २००९ मधील ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी लैंगिक छळ केला होता. २०१८ मध्ये मीटू मोहिमेदरम्यान तिने जाहीरपणे आरोप केले आणि त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. नानांनी हे आरोप फेटाळून लावले. २०१९ मध्ये पुरेशा पुराव्यांच्या अभावामुळे हा खटला बंद करण्यात आला.
