पहिल्या लग्नानंतर घटस्फोट होऊन सहा वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर, प्रसिद्ध दाक्षिणात्य गायिका आणि टीव्ही होस्ट रिमी टॉमी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. पहिल्या घटस्फोटानंतर सहा वर्षांनी तिने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने स्वतः यासंदर्भात माहिती दिली आहे. आयुष्यात एक योग्य जोडीदारा आला असून लवकरच लग्न करणार असल्याचं तिने सांगितलं.
रिमी व्लॉगमध्ये म्हणाली, “मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी ऐकून तुमच्यापैकी बऱ्याच जणांना खूप आनंद होईल. मला एकट्याने प्रवास करायला आणि एकटं राहायला आवडतं. माझं कुटुंब नेहमीच माझ्यासोबत असलं, तरी मला एका जोडीदाराची उणीव भासत होती. मात्र, २०२६ मध्ये माझ्या आयुष्यात एका व्यक्ती आली.”
नवीन जोडीदाराबद्दल रिमी टॉमी काय म्हणाली?
“तो अभिनेता, गायक, नामंकित व्यक्ती किंवा करोडपती नाही. जोडीदार तुम्ही लगेच निवडू शकत नाही. आपण एकमेकांना मोकळेपणाने समजून घेतलं पाहिजे, आपला स्वभाव जुळला पाहिजे. जोडीदाराने आपल्याला वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात पुढे जाण्यास मदत केली पाहिजे. तो आयुष्यात आल्याने आपल्याला शांती मिळायला हवी. सगळं पैसा किंवा प्रसिद्धीसाठी नसतं. मला फक्त माझी काळजी घेणारा आणि मानसिक शांती देणारा जोडीदार हवा आहे,” असं रिमी म्हणाली.
रिमी पुढे म्हणाली, “मला वाटतं तो मला देवानेच दिलेली एक भेट आहे. जसं आपण पुढे आयुष्य जगू, तशा बाकीच्या गोष्टी उलगडत जातील. मला समजलं की आयुष्यात सर्वात मोठी गोष्ट पैसा किंवा प्रसिद्धी नाही. मला फक्त एका असा जोडीदार पाहिजे, जो मला समजून घेईल. अगदी कमी वेळेत आम्ही एकमेकांना समजून घेतलं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे माझं मन खूप शांत झालं. माझं पुढचं आयुष्य चांगलं जाईल या आशेने मी हा निर्णय घेतला आहे.”
रिमी टॉमीचा होणारा पती लिबिन मॅथ्यू कोण आहे?
रिमी टॉमीच्या दुसऱ्या पतीचं नाव लिबिन मॅथ्यू असून तो मुंबईतील एक बॉडीबिल्डर आणि ट्रेनर आहे. मूळ मल्याळी असलेला लिबिन गेल्या काही महिन्यांपासून तिचा फिटनेस कोच होता. या नोव्हेंबरमध्ये डोंबिवलीत एका चर्चमध्ये त्यांचं लग्न होईल.
रिमी टॉमीचं पहिलं लग्न
रिमी टॉमीचं पहिलं लग्न बिझनेसमन रॉईस किझाकूदन यांच्याशी झालं होतं. २७ एप्रिल २००८ रोजी त्रिशूर इथे त्यांचं लग्न झालं होतं. ११ वर्षांच्या संसारानंतर, २०२० मध्ये रिमी टॉमी आणि रॉईस यांनी घटस्फोट घटस्फोट घेतला. रिमी टॉमी ‘चथिक्कथा चंथू’, ‘नम्मल थम्मिल’, ‘उदयनाणू थारम’, ‘बलराम विरुद्ध थरादास’, ‘छोटा मुंबई’, ‘चॉकलेट’, ‘मुल्ला’, ‘एल्सम्मा एन्ना आंकुट्टी’ आणि ‘बॉडी गार्ड’ यांसारख्या चित्रपटातील गाण्यांसाठी ओळखली जाते.
