गणरायाच्या चरणी ‘शान’दार गीत

या गाण्याच्या निर्मीतीचीसुद्धा एक कथा आहे. शान यांना स्वत:चे युटय़ूब चॅनल काढण्याची इच्छा होती.

singer shaan
प्रसिध्द गायक शान ‘माझा बाप्पा श्री’ हा गणपतीच्या गाण्यांचा सोलो अल्बम रसिकांसाठी घेऊन आले आहेत.

गणेशोत्सवाचे वेध लागताच सगळीकडे गणपतीची गाणी ऐकायला मिळतात. दरवर्षी गणपतीची नवनवीन गाणी येत असतात. आपल्या जादूई आवाजाची मोहोर हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत उमटवणारे प्रसिध्द गायक शान ‘माझा बाप्पा श्री’ हा गणपतीच्या गाण्यांचा सोलो अल्बम रसिकांसाठी घेऊन आले आहेत. त्यातील गाणी नुकतीच प्रकाशित करण्यात आली. श्रीगणेशाचं गीत गाण्याचा योग जुळून आल्याचा आनंद व्यक्त करताना हे धमाकेदार गीत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास शान यांनी व्यक्त केला.

‘गौरीहरा लंबोदरा नमो बुद्धीदाता’.. शशांक कोंडविलकर यांच्या लेखणीने सजलेल्या या गीताला गणेश सुर्वे यांनी संगीतबद्ध केले आहे. गणपतीचं गीत जोशपूर्ण हवंच. या जोशासाठी गिरगावातील गिरगाव ध्वज पथक, गजर, कलेश्वरनाथ, जगदंब, राजमुद्रा, स्वस्तिक अशा सहा लोकप्रिय ढोल-ताशा पथकाने या गीताला साथ दिली आहे. या गीतातून उत्सवाचे सर्व भाव प्रकट झाले आहेत.

या गीताचे छायांकन नितीन पाटील, पराग सावंत, प्रतिक वैती, प्रथमेश अवसरे, शुभम वळुंज यांनी केले असून स्टुडिओ छायांकनाची जबाबदारी विकास झा यांनी सांभाळली आहे. संकलन शशांक कोंडविलकर, प्रशांत कोंडविलकर, मिलिंद हेबळे यांचं आहे. लाईव्ह रिदमची जबाबदारी रत्नदिप जामसांडेकर, शशांक हडकर, आदित्य सालोस्कर यांनी सांभाळली आहे. तर कोरससाठी हॅप्पी डॅमिकने साथ दिली असून मिक्सिंग मास्टरिंग तनय गज्जर यांचं आहे.

या गाण्याच्या निर्मीतीचीसुद्धा एक कथा आहे. शान यांना स्वत:चे युटय़ूब चॅनल काढण्याची इच्छा होती. चॅनल लाँच करताना त्याची सुरुवात गाण्यांनी व्हावी असं त्यांना वाटत होतं. चांगल्या कामाची सुरुवात श्रीगणेशाच्या पूजनाने करतात. त्यामुळे युटय़ूब चॅनेलचा ‘श्रीगणेशा’ गणपतीच्या गीतानेच व्हावा या कल्पनेतून हे गीत साकार झालं. आपली जन्मभूमी व कर्मभूमी महाराष्ट्र असल्याने युटय़ुब चॅनेलचं पहिलं गीत मराठी असावं यासाठी शान आग्रही होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Singer shaan release music albums on ganesh chaturthi