बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. कंगनाच्या वक्तव्यामुळे तिच्यावर टीका केली जात आहे. एवढंच काय तर तिला मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची मागणीही केली जात आहे. तर दुसरीकडे कंगनाच्या विरोधात तक्रार दाखल करा, अशीही मागणी केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणी एक म्युझिक कंपोजर आणि गायक विशाल दादलानी याने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

विशाल दादलानी याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने कंगनाचे नाव न घेता तिच्या वक्तव्याविरोधात टीका केली आहे. सध्या त्याच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा सुरु आहे. विशाल दादलानी याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केली आहे. यावेळी त्याने शहीद भगतसिंह यांचा फोटो असलेला एक टी-शर्ट परिधान केला आहे. यावर ‘झिंदाबाद’ असे लिहिले आहे.

“२०१४ पूर्वी कंगना हृतिक आणि आदित्य पांचोलीच्या ताब्यात होती…”, म्हणतं अभिनेत्याने उडवली खिल्ली

हा फोटो पोस्ट करत त्याला कॅप्शन देतेवेळी त्याने कंगनावर टीका केली आहे. “स्वांतत्र्य ही भीक आहे, असे म्हणणाऱ्या त्या बाईला आठवण करुन द्या. माझ्या टी-शर्टवर शहीद सरदार भगतसिंह आहेत. जे नास्तिक, कवी तत्त्वज्ञ, स्वातंत्र्यसैनिक, भारताचा मुलगा आणि शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या २३ व्या वर्षी प्राणांची आहुती दिली. त्यावेळी ओठांवर स्मितहास्य ठेवत, गाणे म्हणत ते फासावर चढले. तिला त्यांची आठवण करुन द्या.” असे विशाल दादलानी म्हणाला.

“सुखदेव, राजगुरु, अशफाकउल्लाह यांसारख्या हजारो जणांनी इंग्रजांसमोर झुकण्यास स्पष्ट नकार दिला. भीक मागण्यास नकार दिला, अशा सर्व लोकांची तिला विनम्रपणे आठवण करुन द्या, जेणेकरुन ती त्यांना पुन्हा कधीही विसरण्याची हिंमत करु शकणार नाही,” अशा भाषेत विशाल दादलीने तिच्यावर संतप्त टीका केली.

कंगना नेमकं काय म्हणाली?

“देशाला १९४८ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वांतत्र्य नसून ती भीक होती. आपल्याला खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले. देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. मी आता राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते. सैन्यदलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीच्या प्रचाराबद्दल काम करते. पण त्यावेळी लोक मला मी भाजपचा अजेंडा चालवत आहे, असे सांगतात. तसेच या मुद्द्यावरुन मला भाजपसोबत जोडलं जाते. पण हे सर्व मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात? हे तर देशाचे मुद्दे आहेत,” असे कंगना म्हणाली होती. 

यानंतर तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. “या मुलाखतीत स्पष्टपणे सांगण्यात आले की, स्वातंत्र्यासाठी पहिले संघटित युद्ध हे १८५७ मध्ये लढले गेले. मला १८५७ ची माहिती आहे पण १९४७ मध्ये कोणती लढाई झाली हे मला माहित नाही. जर कोणी या प्रकरणावर मला माहिती दिली तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करून माफी मागेन… कृपया मला मदत करा,” असे कंगना म्हणाली.