दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सूर्या आणि ज्योतिका ही खऱ्या आयुष्यातील सर्वात आदर्श आणि लाडकी जोडी मानली जाते. त्यांची लव्ह स्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत, सूर्याचे वडील शिवकुमार यांनी एक खुलासा केला. शिवकुमार यांचा सूर्या व ज्योतिकाच्या नात्याला विरोध होता. मग सूर्याने वडिलांची मनधरणी केली होती.

गलाट्टाला दिलेल्या मुलाखतीत शिवकुमार म्हणाले, “सुरुवातीला मी त्याचं प्रेम स्वीकारलं नव्हतं. पण तो खूप हट्टी आहे. सूर्या म्हणाला की तो फक्त तिच्याबरोबरच राहील, नाहीतर आयुष्यभर अविवाहित राहील. मग मी विचार केला की माझ्या करिअरमध्ये मी जवळपास १५० चित्रपट केले आणि त्यापैकी बहुतांशी चित्रपट प्रेमविवाहावर आधारित होते. त्यामुळे शेवटी मी त्यांच्या नात्याला होकार दिला.”

सूर्या त्यावेळी फार बोलायचा नाही. तो लाजाळू होता. सूर्याने ज्योतिकावर प्रेम असल्याचं सांगितल्यानंतर राधिका सरथकुमारने ज्योतिकाशी बोलायला तयार केल्याचं शिवकुमार यांनी सांगितलं. “तो स्वतःच्या मर्जीने जगत होता आणि आता तो दोन मुलांचा बाबा आहे,” असं शिवकुमार हसत म्हणाले.

सूर्या-ज्योतिकाची पहिली भेट

सूर्या आणि ज्योतिका पहिल्यांदा १९९९ मध्ये ‘पुवेल्लम केट्टुपपार’ (Poovellam Kettuppar) या चित्रपटाच्या सेटवर भेटले. त्यावेळी सूर्या सिनेसृष्टीत नवीन होता आणि ज्योतिका मुंबईहून आली होती, तिला तमिळ येत नव्हते. सुरुवातीला ते फक्त चांगले मित्र होते. ज्योतिकाचे कामाप्रती असलेले समर्पण पाहून सूर्या तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर त्यांनी ‘काखा काखा’ सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांत एकत्र काम केले. नंतर त्यांनी प्रेमाची कबुली दिली व लग्नाचा निर्णय घेतला.

सूर्या-ज्योतिकाचे लग्न

सूर्या आणि ज्योतिका यांचे लग्न ११ सप्टेंबर २००६ रोजी झाले. हे लग्न अत्यंत शाही पद्धतीने पार पडले होते, ज्यात दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. लग्नानंतर ज्योतिकाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला होता, परंतु सूर्याने तिला नेहमीच पाठिंबा दिला आणि ती आता पुन्हा चित्रपटांत सक्रिय आहे. सूर्या आणि ज्योतिका यांना दिया व देव ही दोन अपत्ये आहेत.

सूर्याचे आगामी चित्रपट

दरम्यान, सूर्याच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास लवकरच तो अ‍ॅक्शन ड्रामा ‘करप्पू’ मध्ये दिसणार आहे. आरजे बालाजी दिग्दर्शित या चित्रपटात त्रिशा कृष्णन देखील मुख्य भूमिकेत आहे. या वर्षी उन्हाळ्यात हा चित्रपट प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. अभिनेता ‘Suriya47’ नावाच्या एका कॉप अ‍ॅक्शन-कॉमेडीवर देखील काम करत आहे. जितू माधवन दिग्दर्शित या चित्रपटात नझरिया नाझिम फहाद देखील आहे.