रेश्मा राईकवार

दूर आकाशात हेलकावणारं जीवननाटय़ हे कल्पनेतही अंगावर काटा आणणारं चित्र.. प्रत्यक्षात काही शे लोकांना आपल्याबरोबर एका ठिकाणाहून घेऊन उंच उडत सुखरूप जमिनीवर उतरवणं हे आव्हान रोजच्या रोज पेलणाऱ्या वैमानिकाची एक चूकही किती भयंकर असू शकते याची कल्पनाही न केलेली बरी.. अजय देवगण दिग्दर्शित ‘रनवे ३४’ या चित्रपटात वास्तवात एका वैमानिकाकडून घडलेली आगळीक (?) की त्याने केलेल्या पराक्रमाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हवाई थरार आणि न्यायालयीन नाटय़ अशा दोन प्रकारात हेलकावे खात असलेल्या या चित्रपटाच्या विमानाला म्हणूनच थेट प्रेक्षकांच्या मनात उतरणं अंमळ कठीण गेलं आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

एकतर वास्तव घटनेवरून प्रेरित कथा हे या चित्रपटाचं वैशिष्टय़ आणि दुसरं म्हणजे अजय देवगणसारख्या कलाकाराने दिग्दर्शित केलेला चित्रपट म्हणूनही त्याची उत्सुकता जास्त. अजय देवगणने याआधीच त्याचे दिग्दर्शकीय कौशल्य सिध्द केलेले आहे, त्यामुळे हा चित्रपट म्हणजे या वाटेवरचे त्याचे पुढे पुढे पडत जाणारे पाऊल आहे. त्याने आत्तापर्यंत दिग्दर्शित केलेले चित्रपट पाहता किमान दिग्दर्शक म्हणून सातत्याने काही वेगळे विषय देण्याचा प्रयत्न ठळकपणे जाणवतो. ‘रनवे ३४’ हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. २०१५ मध्ये जेट एअरवेजच्या दोहा ते कोचीन विमान उड्डाणाच्या वेळी घडलेल्या घटनेवर या चित्रपटाची कथा बेतली आहे. काहीसा निगरगट्ट, बेधडक वा बेदरकार वागणारा म्हणून प्रसिध्द असलेला वैमानिक कॅप्टन विक्रांत (अजय देवगण). रोजच्याप्रमाणे त्याला दोहा ते कोचीन असे उड्डाण करायचे आहे. आदल्या रात्रीच तो दुबईत उतरला आहे. दुबईतली रात्र पार्टी आणि दारूत घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री त्याला विमान दोह्यावरून कोचीनपर्यंत आणायचे आहे. एरवी नेहमीसारखे वाटणारे हे उड्डाण. त्याची सहवैमानिक तानिया अल्बकर्की पहिल्यांदाच त्याच्याबरोबर उड्डाण करते आहे. नेहमीप्रमाणे सगळा प्रवास व्यवस्थित करून कोचीनला भल्या पहाटे पोहोचलेल्या या विमानाला पाऊस आणि अचानक आलेल्या वादळामुळे खराब वातावरणाचा सामना करावा लागतो. कोचीनवर विमान उतरवता येत नाही म्हणून ते त्रिवेंद्रमकडे वळवण्याच्या निर्णयापासून ते प्रत्यक्षात इंधन शिल्लक नसताना प्रवाशांचा जीव वाचवण्याचा निकराचा प्रयत्न करत वैमानिकाने विमान  उतरवण्यापर्यंतचा घटनाक्रम कसा घडत गेला? हा कथाभाग आपल्याला चित्रपटाच्या पूर्वार्धात पाहायला मिळतो. उत्तरार्धात या वैमानिकाला त्याच्या तथाकथित चुकीच्या निर्णयामुळे घडलेल्या घटनेबद्दल अंतर्गत चौकशीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे एकाच घटनेशी संबंधित अशा दोन पूर्णपणे भिन्न परिस्थितीतील चित्रण पाहताना त्याचा एकसंध परिणाम पाहणाऱ्याच्या मनावर व्हायला पाहिजे असेल तर त्या ताकदीने हे दोन कथाभाग एकत्र जोडण्याचं कौशल्य लेखकाला आणि दिग्दर्शकालाही साधायला हवं. दुर्दैवाने इथे ते तसं होताना दिसत नाही.

संदीप केवलानी आणि आमिल खान यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटाचा नायक कॅप्टन विक्रांत याच्या तोंडी एक संवाद आहे. एखादी घटना का घडली आणि ती कशी घडली? या दोन गोष्टींमध्ये एक जागा असते जिथे सत्य काय ते लपलेलं असतं. या संवादाबरहुकूम चित्रपटाची कथामांडणी करण्यात आली आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मुळात पूर्वार्धात घटनाक्रम पाहात असताना ती कशी घडली आहे, याचं ज्ञान आपल्याला होतं. ती तशीच का घडली? याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न इथे तपास अधिकारी म्हणून आलेले अतिशय चाणाक्षबुध्दी असलेले, कठोर कर्तव्यदक्ष नारायण वेदांत (अमिताभ बच्चन) करतात. पहिल्या भागात व्हीएफएक्स आणि उत्तम दिग्दर्शनाच्या जोरावर प्रेक्षकांना खिळवून ठेवणं अजय देवगणला उत्तम जमलं आहे. त्याच्या चेहऱ्यावरची रेषही हलू न देता उमटणारे तेच तेच थंड भाव आपण दुर्लक्षित केले तरी एकूणच कठीण परिस्थितीत विमान उतरवणारा माजोर्डा वैमानिक म्हणून हे सगळं चित्रण चांगलं झालं आहे. दुसऱ्या भागाकडे येताना मात्र चित्रपटाचं विमान उंच उंच वर जाण्याऐवजी खाली खाली येऊन माती खातं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे विक्रांत हा माजोर्डा आहे, तो कोणाचं ऐकणारा नाही, कर्तव्याबाबत कसूर करणारा नसला तरी मनमानी आहे हे सगळं दाखवून झाल्यावर मग चौकशीचा अध्याय सुरू झाल्यावर  मात्र नाही नाही तो तसा नाही. त्याच्यासारखा तोच एक वैमानिक.. ही भूमिका घेतली जाते आणि ती प्रेक्षकांना पटवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो. हिरो अखेर हिरो असतो, मग तो चूक कशी करेल? नाहीच. त्याने अचूक निर्णय आणि हुशारीच्या जोरावर प्रवाशांचा जीव वाचवला आहे. तो हिरो आहे हे ठसवून देणारा चौकशीचा भाग अमिताभ बच्चन यांच्यासारखा कसलेला अभिनेता असूनही सपशेल वाया गेला आहे.

या साऱ्या कथाभागात आणखीही बऱ्याच गोष्टी अशाच सोडून देण्यात आल्या आहेत. बंगळूरुला विमान उतरवण्याचा पर्याय असतानाही ते त्रिवेंद्रमकडे वळवण्याचा निर्णय वैमानिकाने का घेतला? ही या घटनेचे मूळ कारण असलेली गोष्ट हवेतच गटांगळय़ा खात राहिली आहे. चौकशीदरम्यान संबंधित हवाई कंपनी इंधन वाचवण्यासाठी ते कमी भरते किंवा त्यासाठी ते अवघड परिस्थितीतही आहे त्याच ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न वैमानिकाकडून केला जातो, असं पुटपुटतं काही आपल्याला ऐकू येतं. मात्र खुद्द चित्रपटात म्हटलं आहे तसं चौकशी फक्त वैमानिकांची होते. हवाई कंपन्यांना त्यांच्याकडून घडलेल्या चुकीची उत्तरं द्यावी लागत नाहीत. आणि जर हाच महत्त्वाचा मुद्दा असेल तर त्यावर कथेतून भर देणंही गरजेचं होतं. प्रत्यक्षात हवाई कंपनीचे प्रमुख, त्यांचे वकील, दुसऱ्या कंपनीबरोबरची स्पर्धा, मंत्र्यांना हाताशी धरून केलं जाणारं राजकारण हे सगळे मुद्दे आणि त्याअनुषंगाने येणाऱ्या बोमन इराणी, अंगिरा धर या कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा फक्त तोंडी लावण्यापुरत्या येतात. यातला महत्त्वाचा  भाग अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांच्यातील जुगलबंदीचा असेल तर तीही फारशी रंगत नाही. मुळात अमिताभ यांना आता त्याच पध्दतीच्या भूमिकांमध्ये पाहिलं गेलं असल्याने त्यात फारसं नावीन्य उरलेलं नाही. एका पध्दतीच्या अभिनयापलीकडे चित्रपट जात नाही. त्यातल्या त्यात पूर्वार्धातील मूळ घटनेचा भाग उत्तम जमला आहे. अशाप्रकारच्या कथेला आवश्यक असणारं उत्तम पार्श्वसंगीत इथे अमर मोहिलेंनी दिलं आहे. त्यातल्या त्यात अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून तरी प्रेमकथेच्या चाकोरीतून बाहेर पडण्यासह व्हीएफएक्स तंत्रज्ञानाच्या वापराने एक वेगळी घटना उत्तम रंगवण्याचा साधलेला प्रयत्न यासाठी अजय देवगणचं कौतुक करायला हरकत नाही.

रनवे ३४

दिग्दर्शक – अजय देवगण

कलाकार – अजय देवगण, अमिताभ बच्चन, बोमन इराणी, आकांक्षा सिंग, अंगिरा धर.