मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वुई द वुमन या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाचे काही अनुभव शेअर केले. दिग्दर्शक निर्माता करण जोहर आणि एकता कपूरसोबत गप्पा मारताना स्मृती यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.
यावेळी खासगी आयुष्याशी निगडीतही अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले. पण इराणी यांनी त्याही प्रश्नांची अगदी सडेतोड उत्तरं दिली. अभिनय क्षेत्रात करिअर करत असताना कशाप्रकारे त्यांना घर आणि करिअर या दोन्ही गोष्टी सांभाळताना ताळांबळ उडायची.
पण त्यांनी ही तारेवरची कसरत कशी केली याचाच एक किस्सा त्यांनी या कार्यक्रमात सांगितला.

स्मृती इराणी यांना डिलिव्हरी दरम्यान, रुग्णालयात दाखल केले असताना प्रोडक्शन हाऊसमधून उरलेले चित्रिकरण पूर्ण करण्यासाठी फोन आला होता. त्यांना सेटवर बोलावण्यात आले होते. यावेळी समोर बसलेल्या एकता कपूरनेही स्मृती यांच्या कामाबद्दलच्या निष्ठेची प्रशंसा केली.
एकता म्हणाली की, ‘स्मृतीला तिच्या लग्नाच्या दिवशीही बोलावण्यात आले होते. एवढेच काय तर स्मृतीने गरोदरपणात आणि बाळाला जन्म दिल्यानंतरही मालिकेचे चित्रिकरण केले.’

यावेळी स्मृती यांनीही जुन्या आठवणींना उजाळा देत म्हटले की, ‘मी तेव्हा ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ मालिकेच्या चित्रिकरणात व्यग्र होते. रात्रीचे चित्रीकरण करत असताना मला प्रसुती वेदना जाणवू लागल्या. मी माझ्या सेटवरच्या मैत्रिणीला याबद्दल सांगितले असता ती हसून म्हणाली की, ‘तुला कसं कळलं की या प्रसुतीच्याच वेदना आहेत.’ त्यावर मी तिला म्हणाले की, ‘मी गरोदर आहे, त्यामुळे मला माहितीये की या प्रसुतीच्याच वेदना आहेत.’ माझ्या वेदना वाढायला लागल्यानंतर मला ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा सकाळी ६ वाजता प्रोडक्शन हाऊसमधून पुढील चित्रीकरणाचे विचारण्यासाठी मला फोन आला.

त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हटले की, ‘मला मुल झालं आहे.’ यावर उत्तर देताना ‘कधीपर्यंत मुल होईल?’ असा प्रतिप्रश्न विचारण्यात आला होता. यानंतर पुन्हा एक फोन आला जो माझ्या नवऱ्याने उचलला, ‘स्मृती पुढचे २- ३ दिवस चित्रिकरणाला येऊ शकत नाही,’ असे त्याने सांगितले. यावर उत्तर देताना, ‘ठीक आहे आपल्याकडे ७२ तास आहेत,’ असे ते म्हणाले. बाळाला जन्म दिल्यानंतर एकताने चित्रीकरणासाठी बोलावले होते. ‘या मालिकेच्या चित्रिकरणावेळी आम्ही अशक्य वाटणारी गोष्टही शक्य करुन दाखवली. ही मालिका यशस्वी होण्याचे कारण म्हणजे, या मालिकेसाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने जीव तोडून मेहनत घेतली होती,’ असे स्मृती इराणी म्हणाल्या.

याचदरम्यान इराणी यांनी एक मजेशीर किस्साही सांगितला. ‘एकदा मुलुंड येथे तीन- चार तासांसाठी मी एक आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळे पोलिसांनी मला अटक केली होती. जेव्हा पोलिसांच्या पत्नींना मला अटक झाल्याचे कळले तेव्हा त्या सर्व पोलीस ठाण्यात तुलसीला का अटक केली हा जाब विचारायला आल्या होत्या.’

एकता कपूरने स्मृती यांनी राजकारणात प्रवेश घेतल्यावर तिची काय प्रतिक्रिया होती ते सांगितले. ‘स्मृती मंत्री झाल्याचे कळताच मी तिला फोन केला आणि यापुढे आपण सिनेमा आणि टीव्ही या विषयांवर चर्चा करणं बंद करायचं. यावर तिने हो असं उत्तर दिलं. आम्ही आजही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. दोन मुली कधीच चांगल्आ मैत्रिणी असू शकत नाहीत असे अनेकदा म्हटले जाते. पण ते पूर्णपणे चुकीचे आहे. आजही आमच्या मनात एकमेकींबद्दल तेवढाच आदर आणि सन्मान आहे.’