अभिनेत्री सोभिता धुलिपाला आणि दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य यांचा काहीच दिवसांपूर्वी साखरपुडा पार पडला. अलीकडेच त्या दोघांनी एएनआर अवॉर्ड्स २०२४ सोहळ्यासाठी एकत्र हजेरीही लावली होती. या कार्यक्रमातील त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. ‘मेड इन हेवन’फेम सोभिताने हैदराबादमध्ये नागा चैतन्य आणि त्यांच्या कुटुंबासमवेत दिवाळी साजरी केली. या खास सेलिब्रेशनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, या दोघांचं लवकरच लग्न होणार आहे आणि त्यासंबंधीच्या चर्चाही होत आहेत.
सोभिता – नागा चैतन्यचं दिवाळी सेलिब्रेशन
शेफ तेजस दात्येनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे; ज्यात सोभिता धुलीपाला, नागा चैतन्य, नागार्जुन, अमला अक्किनेनी व अखिल अक्किनेनी दिसत आहेत. दिवाळीच्या निमित्तानं तेजसनं या कुटुंबासाठी खास जेवण तयार केलं होतं. फोटोमध्ये सोभिता राखाडी रंगाच्या साडीत दिसत असून, तिच्या साडीवर चमकीदार बॉर्डर आहे. नागा चैतन्य ब्लॅक आउटफिटमध्ये आणि ऑलिव्ह ग्रीन शूजमध्ये दिसतोय. तसेच, नागार्जुन प्रिंटेड निळ्या रंगाच्या कुर्त्यात व अमला अक्किनेनी हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. संपूर्ण कुटुंब हसतमुखानं पोज देताना दिसत आहे.
शेफ तेजस दात्येनं या फोटोला, ‘हॅपी दिवाळी! अक्किनेनी कुटुंबासाठी जेवण तयार करणं ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. या प्रसंगासाठी धन्यवाद,’ अशी कॅप्शन दिली. हे सेलिब्रेशन हैदराबादच्या जुबिली हिल्स येथे पार पडले.
डिसेंबरमध्ये होणार विवाह
सोभिता आणि नागा चैतन्य लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. इंटरनेटवरील माहितीनुसार, ही दोघं डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वी सोभितानं आपल्या ‘पसुपु दंचदाम’ या पारंपरिक सोहळ्याचे फोटो शेअर केले होते. हा विवाहापूर्वीच्या कामाचा एक भाग होता.
हेही वाचा…Video: अभिनेता राजपाल यादवने दिवाळीच्या दिवशी हात जोडून मागितली माफी, नेमकं काय घडलं?
साखरपुड्याचा क्षण
या वर्षी ऑगस्टमध्ये नागा चैतन्य आणि सोभिता यांनी आपल्या कुटुंबांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. नागार्जुन यांनी या आनंदाच्या क्षणाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आणि कुटुंबात सोभिताचं स्वागत केलं.