आपलं हक्काचं घर असावं अशी अनेकांची इच्छा असते. लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर समीक्षा टक्केचं हेच स्वप्न आता पूर्ण झालं आहे. तिने २०२५ मध्ये तिचं नवीन घर खरेदी केलं होतं. आता जवळपास दीड वर्षांनी समीक्षाला या नव्या घराचा ताबा मिळाला आहे. नवीन घराच्या चाव्या मिळाल्यावर समीक्षाने खास पोस्ट लिहिली आहे.

लेकीने नवीन घर खरेदी केल्यावर तिच्या आई-बाबांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. समीक्षाने आई-बाबा अन् आपल्या बहिणीसह नव्या घरात खास फोटोशूट केलं आहे. १७ व्या वर्षी माझी पहिली कमाई दोन हजार रुपये होती आणि आज मी हक्काचं घर घेतलंय असं लिहित समीक्षाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

समीक्षा लिहिते, “मी हे कॅप्शन कितीतरी वेळा लिहिलंय आणि डिलीट केलंय…कारण, आज जेव्हा मी माझ्या हक्काच्या घरात बसलेय, तेव्हा माझ्याकडे शब्द नाहीये… मी नेमकं काय बोलू? २०२१ मध्ये, मी माझ्या आई-बाबांच्या घरातून बाहेर पडले आणि तेव्हापासून भाड्याच्या घरात राहतेय. गेल्या काही वर्षात अनेक घरं बदलली, सगळं सामान पॅक-अनपॅक केलं…आणि प्रत्येक घराने मला सुंदर आठवणी दिल्या. पण, मनात एक गोष्ट कायम होती…’एक दिन मेरा खुद का घर होगा!’ मार्च २०२५ मध्ये मी हे अपार्टमेंट बूक केलं होतं…वर्षभर सगळं बांधकाम वगैरे सुरू होतं. प्रत्येकवेळी बिल्डिंगजवळून जाताना मी घराकडे पाहायचे आणि म्हणायचे, “हाय घर…मैं जल्द ही आऊंगी।” मला माहीत आहे, हे थोडं फिल्मी आहे. पण, मी माझ्या घराशीच बोलायला सुरुवात केली होती. आता रस्त्याजवळून जाताना Hi बोलावं लागत नाही कारण, आज मला माझ्या घराच्या चाव्या मिळाल्या आहेत.”

समीक्षा पुढे लिहिते, “मी १७ वर्षांची होते…त्यावेळी एकेठिकाणी मी शिकवणी घेतली होती आणि मला माझी कमाई २ हजार रुपये मिळाले होते. तेव्हाच मला पहिल्यांदा स्वत:च्या पायावर उभं राहण्याची आणि स्वत: पैसे कमवण्याची भावना मिळाली. त्या क्षणानंतर फक्त काम करते गेले…ती १७ वर्षांची मुलगी आज इथे कशी पोहोचली हे मला माहिती नाही…पण, मला हे नक्की माहितीये की, मी इथे एकटी पोहोचले नाहीये. प्रत्येक टप्प्यात मला देवाने सांभाळलं आहे…देव नेहमीच माझ्या पाठिशी होता.”

“आज आई-बाबांच्या लग्नाच्या वाढदिवशी मला या नव्या घराच्या चाव्या मिळाल्या…या खास दिवसासाठी मी नेहमीच प्रार्थना केली होती. आई-पप्पा, माझ्याकडे जे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे, कारण तुम्ही मला नेहमी मुक्तपणे स्वप्न पाहू दिलं, माझी स्वत:ची ओळख निर्माण करू दिली. मी कमावलेल्या पहिल्या दोन हजारांपासून… ते माझ्या स्वतःच्या घराच्या चाव्यांपर्यंत…अजूनही विश्वास होत नाहीये की, मी माझं हक्काचं घर खरेदी केलंय. हरे कृष्ण…कृतज्ञ!” अशा भावना समीक्षाने व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, रेश्मा शिंदे, तितीक्षा तावडे, ऋतुजा बागवे, सई गोडबोले, स्वप्नील जोशी अशा अनेक कलाकारांनी समीक्षाच्या पोस्टवर कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.