पुण्यात जन्मलेल्या सोहिल वैद्य या युवकाने दिग्दर्शित केलेल्या ‘गीता’ या लघुपटाचा हॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या लॉसएंजिलिस आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवामध्ये गौरव झाला. सोहिल हा ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचा नातू आणि प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य यांचा मुलगा आहे. ‘गीता’ या लघुपटाची कथा सोहिल याचीच आहे. सोहिल वैद्य याने लॉसएंजिलिस येथील यूएससी स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्स फिल्म इन्स्टिटय़ूट या जगभरात नावाजलेल्या संस्थेतून दिग्दर्शन या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या संस्थेमध्ये प्रवेश मिळणे ही भारतीय मुलांसाठी दुर्मीळ गोष्ट असते. एडवर्ड थॉमस ट्राउंटर मेरिट स्कॉलरशिप आणि जेम्स ब्रिजेस डिरेक्टिंग स्कॉलरशिप अशी दुहेरी शिष्यवृत्ती पटकाविणारा सोहिल हा पहिला भारतीय ठरला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत त्याला ऑस्कर पुरस्कारविजेत्या प्राध्यापकांसमवेत काम करण्याची संधी लाभली. ‘गीता’ हा सोहिलचा लघुपट नॉर्थ हॉलिवूड येथील लेमले थिएटर येथे नुकत्याच झालेल्या लॉसएंजिलिस आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘गीता’ या १६ मिनिटे कालावधीच्या लघुपटाद्वारे सोहिल याने आधुनिक काळातील गुलामी हा विषय मांडला आहे. कोमल डोग्रा, शेफाली डिशे, केशव तळवलकर या मूळ भारतीय वंशाच्या पण सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या कलाकारांनी या लघुपटामध्ये भूमिका केल्या आहेत.