scorecardresearch

नवं काही : माई

अनुष्का शर्माची निर्मिती संस्था ‘क्लिन स्लेट ओटीटी’ची पहिली स्त्रीप्रधान कलाकृती म्हणजे ‘माई’. दूरचित्रवाणी मालिका आणि सध्या ओटीटीवर झकळलेली अभिनेत्री साक्षी तन्वर या वेबमालिकेत मध्यवर्ती भूमिकेतून दिसणार आहेत.

अनुष्का शर्माची निर्मिती संस्था ‘क्लिन स्लेट ओटीटी’ची पहिली स्त्रीप्रधान कलाकृती म्हणजे ‘माई’. दूरचित्रवाणी मालिका आणि सध्या ओटीटीवर झकळलेली अभिनेत्री साक्षी तन्वर या वेबमालिकेत मध्यवर्ती भूमिकेतून दिसणार आहेत. पांढरपेशी विश्वातील राजकारणाचा बळी ठरलेल्या एका सर्वसामान्य आईची कहाणी ‘माई’ या वेबमालिकेतून दाखवण्यात येणार आहे. आपल्या मुलीसोबत घडलेला कटू प्रसंग, त्यानंतर तिचा झालेला मृत्यू अशा आश्चर्यकारक घडामोडी या शीला (साक्षी तन्वर) यांच्या आयुष्यात घडतात. सरळसोटपणे चाललेल्या त्यांच्या आयुष्यात मात्र अचानकच हे वादळ येते. यातील सत्य काय आहे याचा तपास घेण्यासाठी आणि न्यायाच्या शोधात असलेल्या शीलाला न्याय मिळतो का? कोणाचीही मदत न घेता ती एकटीच या सगळय़ाचा शोध घेऊ पाहते तेव्हा एकटय़ाने धाडस करणाऱ्या तिच्यासारख्या स्त्रीला अनेकांचा विरोधही पत्करावा लागतो. अशा रहस्यमय आणि स्त्री केंद्री संकल्पनेतून साकार झालेल्या या वेबमालिकेतून अनेक घडोमोडींचे पैलू उलगडणार आहेत. भारावून टाकणारे प्रसंग आणि संवाद तसेच रहस्यांच्या साखळीची जोडही कथेला देण्यात आली आहे. आपल्याला आजूबाजूला चालू असणाऱ्या हिंसक घटनांचा शोध घेत असताना अनेक नवनवी गुपिते या आईसमोर उलगडत जातात. या सगळय़ातून आपल्या मुलीच्या मृत्यूमागचे गूढ उलगडण्यात एक आई यशस्वी होईल का? की एकामागोमाग एक विणल्या गेलेल्या जाळय़ात ती गुंतून पडेल?, या प्रश्नांची उत्तरं ‘माई’ या वेबमालिकेतून प्रेक्षकांना मिळतील. ‘माई’चे लेखन अतुल मोंगिया, तमल सेन, अमिता व्यास यांनी केले असून दिग्दर्शन अन्षाई लाल आणि अतुल मोंगिया यांनी केले आहे. 

कलाकार – साक्षी तन्वर, विवेक मुश्रन, वामिका गब्बी, अनंत विधांत, रायमा सेन, अंकूर रतन, प्रशांत नारायण आणि वैभव राज गुप्ता  कधी –  प्रदर्शित  कुठे –  नेटफ्लिक्स

गिल्टी माईंड्स

दोन मित्र वकील एका केसच्या निमित्ताने एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. त्यातून त्या दोघांमध्ये म्हणजे कशफ क्वेझ (श्रिया पिळगावकर) आणि दीपक राणा (वरुण मित्रा) या दोघांमध्ये प्रेमही फुलू लागते. अशा परिस्थितीत एकमेकांच्या विरूद्ध ठाकलेले हे वकील एकीकडे खऱ्या गुन्हेगारांना न्यायालयासमोर आणायचा प्रयत्न करतात तर दुसरीकडे त्याविरूद्ध आपल्या अशिलाची बाजू म्हणून काहींना निरपराधी म्हणूनही सिद्ध करण्याची धडपड करतात. एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या दोन वकिलांची व्यावसायिक म्हणून एकमकांविरोधात लढताना होणारी तगमग हा त्याचा एक भाग आहे. पण हा भावनिक मुद्दा बाजूला ठेवला तरी लेखक-दिग्दर्शकाने कथेला आणखी वळण देण्याच्या प्रयत्नात या दोन व्यक्तिरेखांना एका क्षणी खरोखरच एकमेकांसमोर आणून उभे केले आहे. आपल्या अशिलांची बाजू सांभाळत अपराधी कोण-निरपराधी कोण?, याचा शोध घेणाऱ्या या दोन वकिलांच्या आयुष्यातच अशी काही घटना घडते की आपल्यापैकी खरं कोण आणि खोटं कोण हे तपासायची वेळ त्यांच्यावर येते. बहु कलाकारांची फौज असलेल्या या वेबमालिकेचा आशय मानसिक गुंतागुंत आणि त्यातून उभा राहणारा थरार यावर केंद्रित केली आहे. आजच्या काळातील दोघं महत्त्वाकांक्षी तरुण वकील, त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजा- भावभावना अशा अनेक पैलूंचा प्रवास या वेबमालिकेतून उलगडत जातो. या वेबमालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन शेफाली भूषणने केले असून जयंत दिगंबर सोमाळकर सह-दिग्दर्शित या वेबमालिकेला करण ग्रोव्हर, अंतरा बॅनर्जी व नावेद फारूकी यांची प्रस्तुती लाभली आहे.

कलाकार – श्रिया पिळगावकर, वरुण मित्रा, नम्रता शेठ, सुगंधा गर्ग, कुलभूषण खरबंदा, सतीश कौशिक, बेंजामिन गिलानी, विरेन्द्र शर्मा, दीक्षा जुनेजा, प्रणय पचौरी, दीपक कालरा, चित्रांगदा सतरूपा, करिश्मा तन्ना, शक्ती कपूर, सुचित्रा कृष्णमूर्ती, गिरीश कुलकर्णी आणि सानंद वर्मा   कधी -२२ एप्रिल  कुठे – अमेझॉन प्राइम व्हिडीओ

लंडन फाइल्स..

एक गुप्तहेर ओम सिंग (अर्जुन रामपाल) आपल्या एका नव्या मिशनसाठी लंडनमध्ये असतो. अमर रॉय यांच्या हरवलेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी त्याला नेमलेले असते. आपल्या कामाचा अनुभव पाठीशी असतानाही ओम सिंग आपल्या वैयक्तिक वेदनांमुळे आधीच खूप अस्वस्थ असतो. वैयक्तिक दु:ख त्याला त्याच्या प्रत्येक कामात एक प्रकारे अडथळाच ठरत असते. या प्रसंगीही तो अस्वस्थ असला तरी त्याला त्याचे काम पूर्ण करायचे असल्याचे तो तपासाला सुरुवात करतो, यादरम्यान त्याच्या हाताशी अनेक धागेदोरे लागतात. या केसचा शोध घेत असताना ज्या शहरात हा शोध घेतला जात आहे तिथलीच म्हणजे लंडनमधील अनेक रहस्यंही त्याला उमगू लागतात. ही रहस्यं फार वेदनादायक आणि हिंसक असतात. तरीही आपले काम यशस्वी करण्याच्या धडपडीत व्यग्र असूनही त्याला या गडद रहस्यांचाही शोध घ्यावासा वाटतो. ओम सिंग हरवलेल्या मुलीला सुखरूप पोहोचवणार का?, का त्याला दिलेले काम हाच एक त्याच्यासाठी सापळा आहे?, लंडनमधून त्याला अशी नक्की कोणती गुप्त रहस्यं कळणार? आणि कोणती एकच उलथापालथ घडणार?, या सर्व प्रश्नांची उत्तरं उत्कंठावर्धक रीतीने ‘लंडन फाइल्स’ या वेबमालिकेतून पाहायला मिळणार आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन सचिन पाठक यांनी केले आहे.

कलाकार – अर्जुन रामपाल, पूरब कोहली, सपना पबी, मेधा राणा, गोपाल दत्त, सागर आर्या, इवा जेन विलिस. कधी –  २१ एप्रिल  कुठे –  वूट सिलेक्ट

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Something new feminist artwork television series ott netflix people like ysh

ताज्या बातम्या