प्रेमत्रिकोण हा चित्रपट आणि वेबमालिकांसाठी न संपणारा विषय. वूटवर प्रदर्शित झालेली ‘आधा इश्क’ ही वेबमालिका म्हणजे प्रेमत्रिकोणाच्या गोष्टीचा नवा अध्याय म्हणता येईल. अर्थात इथे प्रेमाची गुंतागुंत थोडी वेगळी असली तरी हा विषय आपण पाहिलेलाच नाही, असा दावा करता येणार नाही. एकच व्यक्ती आणि त्याच्या प्रेमात पडलेल्या मायलेकी असे या वेबमालिकेचे सर्वसाधारण कथानक आहे. ‘उतरन’ आणि ‘पवित्र रिश्ता’ सारख्या मालिकेचे दिग्दर्शन केलेल्या नंदिता मेहरा यांनी या वेबमालिकेचे दिग्दर्शन केले आहे. नंदिता यांनी मालिकेसाठी सहलेखनही केले आहे. नऊ भागांच्या या वेबमालिकेचे लेखन जया मिश्रा यांनी केले आहे. जया मिश्रा यांनीही ‘बेबाकी’, ‘द मॅरीड वुमन’सारख्या वेबमालिकांचे लेखन केले आहे. लेखिका आणि दिग्दर्शिका दोघींनीही याआधी असे विषय हाताळले असल्याने साहजिकच ‘आधा इश्क’ या वेबमालिकेत प्रेमाचा हा त्रिकोण काही वेगळय़ा पध्दतीने रंगवलेला पाहायला मिळेल, अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. साहिर, रोमा आणि तिची मुलगी रेने यांच्याभोवती या वेबमालिकेचे कथानक गुंफण्यात आले आहे. रेने ज्या महाविद्यालयात आहे, तिथे साहिर प्राध्यापक म्हणून रुजू होतो. या तरुण प्राध्यापकाच्या प्रेमात पडलेली रेने साहिर आणि तिची आई रोमा यांच्या प्रेमकथेबद्दल अनभिज्ञ आहे. एकेकाळी साहिर आणि रोमा प्रेमाच्या बंधनात अडकले होते, मात्र रोमासाठी आता हा भूतकाळ आहे. इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा साहिरचा रोमाच्या आयुष्यात प्रवेश होतो खरा.. त्यामुळे सुरू झालेला हा गुंता कसा सुटणार याचे उत्तर ही वेबमालिका देणार आहे. या वेबमालिकेसाठी प्रसिध्द गीतकार गुलजार यांनी खास गीत लिहिले आहे. एकेकाळी टेलीविश्वाचा लोकप्रिय चेहरा असलेल्या अभिनेत्री अमना शरिफचे ओटीटीवरील पदार्पण हेही या वेबमालिकेचे आकर्षण ठरले आहे.

कलाकार –  कुणाल रॉय कपूर, अमना शरिफ, गौरव अरोरा. 

कधी –  प्रदर्शित  कुठे –  वूट

तुलसीदास ज्युनियर

प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची निर्मिती असलेला ‘तुलसीदास ज्युनियर’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट अखेर या आठवडय़ात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होतो आहे. क्रीडापट प्रकारात मोडणारा हा चित्रपट गेली दोन वर्ष प्रदर्शनासाठी रखडला होता. अपयशामुळे खचलेला एक स्नूकर विजेता आणि त्यांचे अपयश पुसू पाहणारा त्यांचा मुलगा असे कथानक असलेला चित्रपट त्यातील कलाकारांमुळे वेगळा ठरला आहे. दिवंगत अभिनेते राजीव कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा अखेरचा चित्रपट. करोनाकाळात राजीव कपूर यांचे निधन झाले, गेली कित्येक वर्ष अभिनयापासून दूर असलेल्या कपूर खानदानातील शेंडेफळ राजीव यांना रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी या चित्रपटाने प्रेक्षकांना दिली आहे. याशिवाय, अभिनेता संजय दत्त याचीही यात महत्त्वाची भूमिका असून खुद्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरही या चित्रपटात पुन्हा एकदा अभिनय करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृदुल महेंद्र यांनी केले असून लेखन त्यांनी आणि आशुतोष गोवारीकर यांनी केले आहे.

कलाकार –  संजय दत्त, वरुण बुध्ददेव, राजीव कपूर, तस्वीर कामिल, दलिप ताहिल.

कधी –  २३ मे कुठे –  नेटफ्लिक्स

रानबाजार

अभिजित पानसे लिखित, दिग्दर्शित ‘रानबाजार’ ही सध्या ओटीटी विश्वातील बहुचर्चित वेबमालिका ठरली आहे. मराठीतील मोठय़ा कलाकारांची फौज असलेली, थोडी ठळक मांडणी आणि विषयावर भाष्य करणारी असल्याने या वेबमालिकेबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राजकारण हा या वेबमालिकेच्या विषयाचा केंद्रिबदू असला तरी त्या अनुषंगाने अनेक पैलू, अनेक विषयांवर यात भाष्य करण्यात आले आहे. राजकारण आणि गुन्हेगारी असा हातात हात घालून चालणारा विषय आणि त्याला थरारपटाच्या शैलीची जोड देण्यात आली आहे. आजवर कधीही न पाहिलेलं राजकारण, त्यातील धूर्त डावपेच, एकमेकांना अडकवण्यासाठी शह-काटशहाची जाळी, उत्कंठा वाढवत नेणारं कथानक असं सगळंच या वेबमालिकेत पाहायला मिळेल, असा दावा मालिकेच्या कर्त्यांकडून करण्यात आला आहे. या वेबमालिकेचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याापासूनच लोकांचे याकडे लक्ष वेधले गेले होते. विषयाच्या बरोबरीने मालिकेत असलेले मराठीतील झाडून सगळे मोठे कलाकार हेही औत्सुक्याचे ठरले आहे. प्लॅनेट मराठीवर प्रदर्शित झालेल्या या वेबमालिकेत तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, उर्मिला कोठारे, सचिन खेडेकर, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे असे ओटीटी विश्वापासून दूर असलेले मराठी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विषय आणि कलाकार यामुळे ‘रानबाजार’ ही वेबमालिका प्रदर्शनाआधीपासूनच लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

कलाकार – तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, उर्मिला कोठारे, सचिन खेडेकर, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, मोहन आगाशे, वैभव मांगले, अनंत जोग, सुरेखा कुडची, अभिजित पानसे, नीलेश दिवेकर.

कधी –  प्रदर्शित  कुठे – प्लॅनेट मराठी