ओटीटीवर एकाच वेळी नवे चित्रपट पाहण्याचा योग कधी कधी जुळून येतो. तसा योग सध्या मे अखेरच्या आठवडय़ापासून जुळून आला आहे. आशुतोष गोवारीकर यांची निर्मिती असलेला ‘तुलसीदास ज्युनिअर’ हा चित्रपट थेट ओटीटीवर गेल्या आठवडय़ाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झाला होता. आता वेवगेळय़ा ओटीटी वाहिन्यांवर चित्रपटगृहातून आधी प्रदर्शित झालेले तीन चित्रपट पाहायला मिळणार आहेत. अभिनेता जॉन अब्राहम याची मुख्य भूमिका असलेला ‘अटॅक – पार्ट १’ हा त्यापैकी एक. लक्ष्य राज आनंद लिखित, दिग्दर्शित हा चित्रपट एप्रिलमध्ये चित्रपटगृहातून प्रदर्शित झाला होता. अपहरणनाटय़ रंगवणारा हा चित्रपट वास्तव घटनेवरून प्रेरित असल्याचं सांगण्यात येतं. या चित्रपटात जॉनबरोबरच जॅकलिन फर्नाडिस आणि रकुल प्रीत सिंग यांच्याही भूमिका आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कलाकार – जॉन अब्राहम, जॅकलिन फर्नाडिस, रकुल प्रीत सिंग, प्रकाश राज, रत्ना पाठक शाह. कधी –  प्रदर्शित  कुठे –  झी ५

केजीफ २

दाक्षिणात्य चित्रपट आणि वेबमालिकांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘प्राइम व्हिडीओ’वर हिंदी चित्रपटसृष्टीला हलवून सोडणारा ‘केजीफ २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सोन्याची खाण आणि त्याच्या मालकीवरून दोघांमध्ये रंगलेले युद्ध हा या चित्रपटाचा मुख्य विषय. उत्तम कलाकार, उत्तम व्हीएफएक्सच्या जोरावर या चित्रपटाने देशभरातून सर्वाधिक कमाई केली आहे. दाक्षिणात्य अभिनेता यशची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात हिंदी चित्रपट अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रवीना टंडन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तिकीटबारीवर दक्षिणेकडे नव्हे तर हिंदी भाषिक पट्टय़ात ५०० कोटी रुपयांच्या आसपास कमाई करत बॉलीवूडला चांगलाच धक्का दिला. हा चित्रपट प्राइमवर आधी भाडेतत्त्वावर पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. आता तो रीतसर प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे.

कलाकार –  यश, संजय दत्त, रवीना टंडन, प्रकाश राज, अच्युत कुमार 

कधी –  प्रदर्शित  कुठे -प्राइम व्हिडीओ

हिरोपंती २

कधी आला, कधी गेला.. कळू नये अशा वेगाने चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा, प्रेक्षक प्रतिसादाअभावी तिथून लगेच पसार झालेला आणि आता प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे ‘हिरोपंती २’. टायगर श्रॉफने ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिनेत्री क्रिती सननचाही तो पहिलाच चित्रपट होता. सिक्वलमध्ये मात्र क्रितीचा सहभाग नाही. तिच्या जागी नायिका म्हणून तारा सुतारियाची वर्णी लागली आहे. एप्रिलमध्ये चित्रपटगृहातून प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला तिकीटबारीवर फारशी बरी कामगिरी करता आली नाही. टायगरच्या चाहत्यांना आता हा चित्रपट ओटीटीवर पाहण्याची संधी मिळाली आहे.

कलाकार – टायगर श्रॉफ, तारा सुतारिया, नवाझुद्दीन सिद्दीकी.

कधी –  प्रदर्शित  कुठे – प्राइम व्हिडीओ

स्ट्रेन्जर थिंग्ज ४

‘स्ट्रेन्जर थिंग्ज ४’ ही बहुप्रतीक्षित वेबमालिकाही नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. ‘अपसाइड डाऊन’चे भयगूढ वाढवणाऱ्या या मालिकेचे चौथे पर्व दोन भागांत विभागण्यात आले आहे. त्याचा पहिला भाग आता प्रदर्शित झाला आहे तर दुसरा भाग जुलैमध्ये प्रदर्शित होणार आहे. स्टार कोर्टवर लढलं गेलेलं भयंकर युद्ध हॉकिन्सवासी विसरू शकत नाहीत. या घटनेने केलेली उलथापालथ खूप मोठी आहे. त्या घटनेला सहा महिने उलटून गेलेत. हॉपरचा मृत्यू झाला आहे, असं सगळय़ांना वाटत आहे. पण या भागात हॉपरचं पुन्हा दर्शन होणार असल्याने एकंदरीतच त्याच्या व्यक्तिरेखेला दिलं गेलेलं वळणं पाहणं चाहत्यांसाठी औत्सुक्याचा विषय आहे. शिवाय एल आणि माईक पुन्हा दुरावले होते. एल सध्या विल बायर्स कुटुंबाबरोबर कॅलिफोर्नियात राहते आहे. त्यामुळे हे प्रेमी जोडपं नव्या भागात कधी आणि कसं एकत्र येतं, याचबरोबरीने विल, माईक, लुकस आणि डस्टिन ही चौकडी या वेळी काय कमाल करणार?, याचीही उत्सुकता नव्या भागात आहे.

कलाकार –  विओना रायडर, डेव्हिड हार्बर, मिली बॉबी ब्राऊन, फिन वुल्फहार्ड.

कधी –  प्रदर्शित  कुठे –  नेटफ्लिक्स

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Something new ott movies creation displayed southern films webmasters prime video filmmaking ysh
First published on: 29-05-2022 at 00:06 IST