Sonali Kulkarni The Paradise Movie Experience : मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेविश्वातही आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या ‘द पॅराडाइज’मुळे चर्चेत आहे. यामधील अभिनेता नानीच्या आईची ‘समक्का’ ही भूमिका सोनालीने साकारली आहे. तिच्या लूकची आणि अभिनयाची सर्वत्र चर्चा होत असून आता सोनालीने दाक्षिणात्य सिनेविश्वात काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
‘द पॅराडाइज’ या अॅक्शन-ड्रामा सिनेमाचे श्रीकांत ओडेला यांनी दिग्दर्शन केले असून सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. सोनाली कुलकर्णी म्हणाली, “एक-एका शब्दासाठी श्रीकांतने आम्हाला त्रास दिला आहे. प्रत्येक शब्दासाठी आम्हाला विनय म्हणायचा की, ‘हे खूप चांगलं झालं आहे, पण आता आपण अजून एकदा भावना ओतून करूयात.'”
पावसातही शूटिंग केले – सोनाली
पुढे सोनाली म्हणाली, “कोणताही टेक आम्हाला ओके आहे असं सांगितलं की, आम्हाला आश्चर्याने कसे काय पास झालो असे वाटायचे. शूटिंग करताना फक्त भावनिक नाही तर तेव्हा कसे वातावरण होते हे सुद्धा आम्ही सांगू शकतो. खूप थंडी असूनही आम्ही पावसात शूटिंग केले. आम्ही कोणत्या परिस्थितीतून गेलोय हे शब्दांतही सांगू शकत नाही. श्रीकांतबरोबर काम करताना आम्ही एक पदवी मिळवली आहे. आता आम्ही कोणत्याही दिग्दर्शकाबरोबर आणि कोणत्याही सिनेमात काम करू शकतो.”
याच मुलाखतीमध्ये अभिनेता नानीने शूटिंगचा किस्सा सांगितला. तो म्हणाला, “हीच आमच्या पूर्ण सिनेमाची प्रोसेसची गोष्ट आहे. शूटिंग असो वा डबिंग, हे सगळं करताना चांगलं झालंय पण आपण पुन्हा एकदा करूया, असेच बोलले जायचे. सरांनी जर एखादा टेक ओके दिला तर आम्ही कलाकार एकमेकांकडे आश्चर्याने बघायचो.”
‘द पॅराडाइज’ हा दिग्दर्शक श्रीकांत ओडेला यांचा अॅक्शन-ड्रामा सिनेमा असून अभिनेता नानी हा मुख्य भूमिकेत आहे, तर सोनाली कुलकर्णीने त्याच्या आईची दमदार भूमिका केली आहे. सिकंदराबादमधील झोपडपट्टीच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाची कथा असून सामाजिक अन्याय आणि संघर्षाचा विषय मांडण्यात आला आहे. ‘द पॅराडाइज’ २४ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. सिनेमाने पहिल्या आठवड्यात भारतात सुमारे १०८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने सुमारे १६० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.
