Aarya Ambekar : आर्या आंबेकर इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायिका आहे. आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या पद्धतीची गाणी गात तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आर्याने फक्त गायिका म्हणूनच नाही तर अभिनेत्री म्हणूनही ओळख मिळवली आहे. अशातच आता तिने लोकप्रिय बॉलीवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

संजय लीला भन्साळी त्यांचे मोठे सेट, बिग बजेट चित्रपट आणि सर्जनशीलता यासाठी ओळखले जातात. फक्त चित्रपट दिग्दर्शक म्हणूनच नाही तर म्युझिक डिरेक्टर म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांनी अनेक गाण्याचंही दिग्दर्शन केलं आहे. अशातच आता आर्याने याबद्दल सांगितलं आहे. आर्याने यावेळी फक्त गायिका म्हणूनच नाही तर अभिनेत्री म्हणूनही संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

संजय लीला भन्साळी यांच्याबद्दल आर्याची प्रतिक्रिया

‘सारे काही’ला दिलेल्या मुलाखतीत आर्याला तुला अभिनेत्री म्हणून कोणाबरोबर काम करण्याची इच्छा आहे असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “संजय लीला भन्साळी. त्यांच्याबरोबर म्युझिक डिरेक्टर म्हणूनही मला काम करायला आवडेल. ते खूप उत्तम म्युझिक डिरेक्टर आहेत आणि अभिनय करायलासुद्धा आवडेल.”

आर्या आंबेकरने आतापर्यंत अनेक लोकप्रिय कलाकार, गायक, दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे. अलीकडेच ती ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘कमळी’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेत झळकलेली. त्या पू्र्वी तिने सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटात तन्वी ही भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका खूप लोकप्रिय ठरली आणि अनेकांनी तिच्या कामाचं कौतुक केलं.

आर्याने या मुलाखतीत ती गायनाच्या आणि अभिनयाच्या अशा दोन्ही क्षेत्रात अनपेक्षितपणे आल्याचं म्हटलं आहे. लहानपणापासून गायनाचा रियाज आणि कार्यक्रम करत असल्याने तिला त्यात संधी मिळत गेली आणि ती पुढे गायिका म्हणून काम करू लागली असं तिने सांगितलं. याचवेळी तिने सतीश राजवाडे यांनी सांगितलं की तिला समोर ठेवून तन्वी हे पात्र लिहिण्यात आलं होतं असं म्हटलं आहे.

आर्या ओघाओघाने जरी या क्षेत्रात आली असली तरी तिने तिच्या कलेने, मेहनतीमुळे आणि स्वभावामुळे अनेकांना आपलंसं केलं आहे. तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे आता ती पुढे गायन आणि अभिनय अशा दोन्ही क्षेत्रात नवनवीन कामं करण्यासाठी उत्सुक आहे.