सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांचे ८ मे रोजी लग्न झाले. दोघांनी शीख पद्धत ‘आनंद कारज’ या पद्धतीनुसार लग्न केले. पण आता शीख समुदायातील काही लोकांनी लग्नात परंपरेचं उल्लंघन केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मिड-डेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या (एसजीपीसी) माजी प्रबंधकांनी सध्याच्या प्रबंधकांवर नाराजी व्यक्त केली आहे. माजी प्रबंधकांच्या मते, सोनम आणि आनंद यांच्या लग्नावेळी म्हणजे आनंद कारजवेळी आनंदच्या पगडीतून कलगी हटवण्यात आली नाही. हे परंपरेच्या विरुद्ध आहे. आता माजी प्रबंधकांनी हे प्रकरण अकाल तख्तच्या निदर्शनास आणून दिले आहे.

SONAM
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

माजी प्रबंधकांच्या मते, शीख धर्मात लग्नात नवऱ्या मुलाच्या पगडीतून कलगी हटवणे बंधनकारक असते. पण सोनम आणि आनंदच्या लग्नात या नियमाकडे कानाडोळा करण्यात आला. ज्या प्रबंधकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडले होते त्या प्रबंधकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या (एसजीपीसी) माजी प्रबंधकांची इच्छा आहे.

शीख पद्धतीनुसार हा विवाहसोहळा पार पडला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

सध्या सोनम कान चित्रपट महोत्सवात व्यग्र आहे. यानंतर ती ‘वीरे दी वेडिंग’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असणार आहे. १ जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तर आनंदही लवकरच त्याच्या ब्रँडचे शोरूम दिल्लीत सुरू करणार आहे.