करोना काळात अभिनेता सोनू सूद गरिबांसाठी ‘मसिहॉं’ बनला. एकीकडे देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक मदतीसाठी सैरावैरा भटकत होते, तर दुसरीकडे अशा लोकांसाठी अभिनेता सोनू सूद अगदी देवदूतासारखा लोकांच्या मदतीसाठी धावून आला. गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये मजूरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत सोनू सूद लागोपाठ लोकांची मदत करतोय. यासाठी त्याने ‘सोनू सूद फाऊंडेशनची स्थापना केली. त्याचं हे काम पाहून अनेकांनी तर त्याची पूजा सुद्दा करण्यास सुरूवात केली. तर काही जणांनी त्याच्या कामाला ‘पब्लिसीटी स्टंट’ असल्याचं सांगितलं. त्याचं हे काम पाहून अनेक नागरिक, तसंच सेलेब्रिटीजनीही सोनू सूदने राजकारणात यावं, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली होती.

अभिनेता सोनू सूद राजकारणात येणार, अशा चर्चा अनेकदा समोर येत असतात. पण प्रत्येक वेळी अभिनेता सोनू सूदने यावर प्रतिक्रिया देत त्याला राजकारणात कोणताच रस नसल्याचं सांगत आला आहे. पण त्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर सोनू सूद राजकारणात येण्याबाबतच्या चर्चांना उधाण आलंय. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी कॉंग्रेसच्या वतीने जोरदार तयारी सुरू केलीय. यासाठी कॉंग्रेसने २५ पानांचं एक ड्राफ्ट देखील तयार केलंय. ज्यांची फॅन फॉलोइंग उत्तम आहे, सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत, तसंच आजच्या तरूण पिढीतील नव्या चेहऱ्यांना यंदाच्या मुंबई महापालिका निवडणूकीसाठी तिकीट देण्याबाबत कॉंग्रेसचा विचार सुरूय. यात कॉंग्रेसने अभिनेता सोनू सूद, रितेश देशमुख आणि मिलिंद सोमण या तिघांच्या नावावर सध्या चर्चा सुरूयत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

एका ट्विटर अकाउंटवरून सोनू सूद मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाकडून उतरणार असल्याची एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर सोनू सूद राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांना आणखी वेग आला. परंतू त्याआधीच अभिनेता सोनू सूदने आपली प्रतिक्रिया देत या चर्चांना पूर्णविराम दिलाय. हे ट्विट शेअर करत सोनू सूदने लिहिलं, “यात कोणतंही सत्य नाही. मी एक सामान्य व्यक्ती म्हणूनच आनंदी आहे.”

सोनू सूदकडे नुकतंच एका सोशल मीडिया युजरने एक कोटी रूपयांची मागणी केली होती. याला देखील सोनू सूदने त्याच्या मजेदार अंदाजात उत्तर दिलंय. “बस फक्त एक कोटीच? आणखी थोडं जास्त मागायचं होतं.” सोनू सूदकडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारची मागणी केली जात असतेच. पण याला कसं उत्तर द्यायचं हे सोनू सूदला चांगलंच समजलंय.

सोनू सूदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतंच त्याचा एक म्युझिक व्हिडीओ रिलीज झालाय. ‘साथ क्या निभाओगे’ हा म्युझिक व्हिडीओ ९० च्या दशकातल्या गाण्याचं रीक्रिएशन केलंय. यात सोनू सूदसोबत अभिनेत्री निधी अग्रवाल सुद्धा झळकलीय.