दिशा सालियन मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी सीबीआयकडे जबाब नोंदवल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. कलम ३७६, ३०२ अंतर्गत दाखल केलेल्या गुन्यात मुख्य आरोपी म्हणून सूरज पंचोली, आदित्य ठाकरे, दिनो मोरिया यांची नाव आहेत. तसेच रिया चक्रवर्ती, परमबीर सिंग, रोहन रॉय, सचिन वाझे हे कटात सामील असल्याचं एफआयआरमध्ये नमूद आहे. दिशा सालियान प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सूरज पंचोलीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे.

मी कधीच दिशा सालियन, आदित्य ठाकरेंना भेटलेलो नाही – सूरज पंचोली

सूरज पंचोलीने लिहिलं, “लोकांसमोर काही गोष्टी यायला हव्या, म्हणून मी ही पोस्ट करायचं ठरवलंय. मागील काही वर्षांपासून दिशा सालियान मृत्यूप्रकरणात माझं नाव घेतलं जातंय. त्यामुळे मी हे स्पष्टपणे सांगतोय की मी आयुष्यात कधीच दिवंगत दिशा सालियानला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भेटलो नव्हतो. तसेच मी आदित्य ठाकरेंनाही आयुष्यात कधीच भेटलेलो नाही.”

या प्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही – सूरज पंचोली

पुढे सूरज पंचोली म्हणाला, “माझा काहीच संबंध नसलेल्या प्रकरणात माझं नाव घेतलं जातंय हे खूपच वाईट आहे. कारण माझा या प्रकरणाशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. मी इतके दिवस शांत राहिलो, कारण माझ्याबद्दल बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं मला उत्तर द्यायचं नव्हतं. पण एकच गोष्ट जर वारंवार घडत असेल तर एकवेळ अशी येते की स्वतःसाठी तुम्हाला बोलावंच लागतं.”

पाहा सूरज पंचोलीची पोस्ट

पुन्हा चौकशीची गरज वाटत असेल तर… – सूरज पंचोली

दिशा सालियान प्रकरणातील सीबीआय चौकशीबद्दल सूरज पंचोली म्हणाला, “४-५ वर्षांपूर्वी या प्रकरणी माझी पोलीस व सीबीआयने चौकशी केली होती. मी माझा जबाबदेखील नोंदवला होता. माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही. जर कोणत्याही तपास यंत्रणेला वाटत असेल की माझी पुन्हा चौकशी करण्याची गरज आहे किंवा माझ्याकडून काही माहिती हवी आहे, तर मी पूर्ण सहकार्य करेन.”

एखाद्याचा मृत्यू दुसऱ्याची प्रतिमा मलिन करण्याचं कारण ठरू नये – सूरज पंचोली

पुढे सूरजने त्याचं नाव चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात ओढलं जाऊ नये, असं म्हटलंय. “अशा कोणत्याही प्रकरणात माझं नाव घेण्यापूर्वी तथ्यांची तपासणी करा. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा सखोल व निष्पक्ष तपास करण्यात यावा, पण या प्रकरणात प्रोपगंडा करून ज्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, त्याचाही तपास व्हावा. कारण कोणाचाही मृत्यू पुराव्यांअभावी दुसऱ्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचं कारण ठरू नये, असं मला वाटतं. जे ही पोस्ट वाचत आहेत, त्यांना मला इतकंच सांगायचंय की तुम्ही सोशल मीडियावर बघता ती प्रत्येक गोष्ट खरी नसते,” असं सूरज पंचोलीने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय.