बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली आणि त्याच्या कुटुंबियांनी दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या आईच्या म्हणजे राबिया खान विरोधात ट्विटरवर अपमानास्पद टिपण्णी केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला आहे.
कुटुंबातील निकटवर्तीयाने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई उच्च न्यायालयात जबाब देऊनही राबिया खान यांनी ट्विटरवर पांचोली कुटुंबियांविरुद्ध अपमानास्पद टिपणी करत आल्या आहेत. यामुळेच पांचोली कुटुंबियांनी त्यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला असून पुढच्या आठवड्यात त्यावर सुनावणीही होणार आहे. जून २०१४ ला पांचोली परिवाराने राबिया खान यांच्या विरोधात टीव्ही आणि वर्तमानपत्रात तसेच ट्विटरवर त्यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्ये केल्याबद्दल तब्बल १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा केला होता.
त्यावेळीही पांचोली यांनी न्यायालयात याचिका दाखल करुन विनंती केली होती की राबिया यांना अशाप्रकारच्या टिप्पणी करण्यावर मनाई केली पाहिजे. त्यांनी या तक्रारीत सांगितले आहे की, ४ मार्च ते १ मे २०१४ च्यादरम्यान पांचोली कुटुंबियांची इज्जत कमी करणाऱ्या १८ अपमानास्पद टिपण्या केल्या गेल्या होत्या.
जिया खानने ३ जून २०१३ रोजी मुंबईतील जुहू परिसरातील तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येच्या आरोपाखाली अभिनेता सूरज पांचोली याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. कालांतराने या खटल्याने नवे वळण घेतले आणि जिया खानच्या आईच्या याचिकेनंतर हा खटला सीबीआयकडे सुपूर्त करण्यात आला होता.