इंडस्ट्रीत असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांचं लग्न ठरता ठरता मोडलं आहे. तर काहींनी जाणीवपूर्वक भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. अशातच लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीनेही तिचा साखरपुडा पुढे ढकलण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतल्याचं म्हटलं आहे. तिने यामागचं कारण सांगत त्या नात्यत ती आनंदी नव्हती असंही म्हटलं आहे.

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनचं नुकतंच ब्रेकअप झालं असून,ती सोशल मीडियावर नियंत्रक स्वभावाच्या नात्यातून सावरण्याबद्दल मोकळेपणाने बोलत असते. नुकतंच धन्या वर्माला दिलेल्या मुलाखतीत तिने नेमकं काय घडलं, याबद्दल सविस्तर खुलासा केला.

अनुपमाबरोबर नेमकं काय घडलं?

अनुपमाने सांगितलं की, तिचा एक्स-बॉयफ्रेंडबरोबर साखरपुडा होणार होता. मात्र, मनात कुठेतरी काहीतरी चुकीचं होत असल्याची जाणीव झाल्याने तिने साखरपुडा पुढे ढकलला. अनुपमाने सांगितलं की, ती दोन वर्षे एका व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. विशेष म्हणजे, रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच दोघे साखरपुडा करण्यासाठी तयार झाले होते. याबद्दल बोलताना ती म्हणाली, “जेव्हा ते तुम्हाला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते तुमच्या इतक्या जवळ जातात की पहिल्या काही भेटीनंतरच तुम्हाला त्यांच्या घरी घेऊन जातात. तुम्ही त्यांच्या कुटुंबाला भेटता, त्यांच्याबरोबर जेवण करता. तीन महिन्यांत ती व्यक्ती साखरपुड्याबद्दल बोलू लागते. त्याच्या घरचे लग्नासाठी तुम्हाला कोणतं डेस्टिनेशन आवडेल, किती लोकांना बोलवायचं आहे? हे सगळं विचारायला लागतात पण रिलेशनशिपला तीन महिनेच झाले असताना हे इतकं लवकर होऊ शकत नाही”.

…म्हणून घेतला साखरपुडा पुढे ढकलण्याचा निर्णय

अभिनेत्रीने पुढे ‘गोल्ड डिगर’ म्हणणाऱ्या लोकांनाही उत्तर दिलं. साखरपुडा पुढे ढकलण्याचा निर्णय आपणच घेतला होता, कारण या व्यक्तीबरोबर लग्न केलं असतं तर पुढे घटस्फोट होण्याची शक्यता होती, अशी जाणीव झाल्याचं तिने सांगितलं. ती म्हणाली, “जे लोक मला ‘गोल्ड डिगर’ आणि अशी नावं ठेवतात, त्यांना मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. मी त्या व्यक्तीबरोबर लग्न केलं असतं आणि जर मी साखरपुड्याचा निर्णय थांबवला नसता, तर कदाचित त्या लग्नाचा शेवट घटस्फोटात झाला असता. मला माहीत होतं की हे प्रेम नाहीये, तर मी अभिनय सोडावा यासाठीचा केवळ एक प्रयत्न आहे. मी नेहमी म्हणायचे की, मला वाटतं ही व्यक्ती खूप लहान आहे. आपल्याला आणखी थोडा वेळ घेण्याची गरज आहे. जर मुलांची चिंता असेल तर आपल्याकडे बीजांड गोठवण्याचा पर्याय आहे”.

अनुपमाने पुन्हा स्पष्ट केलं की, मनात कुठेतरी हे प्रेम नसून आपल्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न असल्याची जाणीव होत होती, त्यामुळे तिने साखरपुडा वारंवार पुढे ढकलला. तिला तसं जाणवत होतं की हा निर्णय घेण्याची ही योग्य वेळ नाही. तिने पुढे सांगितलं की, या नात्यात असताना तिला मनःशांती मिळण्याऐवजी कायम चिंता आणि अस्वस्थता जाणवत होती. अनुपमाने या नात्याबद्दल बोलताना कोणाचंही नाव घेतलेलं नाही. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार जुलैमध्ये तिने सोशल मीडियावर ब्रेकअप झाल्याचं संकेत देत पोस्ट केली होती. तेव्हापासून ती नियंत्रण मिळवणाऱ्या स्वभावाच्या व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याबद्दल आणि त्यातून सावरण्याच्या प्रवासाबद्दल पोस्टच्या माध्यमातून मोकळेपणाने व्यक्त होत आहे.

अभिनेत्रीने काही काळ सोशल मीडियापासून दूर होती. दरम्यान, २०२५च्या सुरुवातीला अनुपमा आणि लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेते चियान विक्रम यांचा मुलगा अभिनेता ध्रुव विक्रम यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. चाहत्यांनी दोघांचा एक फोटो शोधून काढल्यानंतर या चर्चांना उधाण आलं होतं. हा फोटो त्यांच्या दोघांच्या कॉमन स्पॉटिफाय प्लेलिस्टचा डिस्प्ले पिक्चर असल्याचा चाहत्यांनी दावा केला होता. ‘बायसन कालामादन’ मध्ये एकत्र काम केल्यानंतर अनुपमा आणि ध्रुव विक्रम यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. चेन्नई आणि मुंबईतील काही पुरस्कार सोहळ्यांमध्ये दोघे एकत्र दिसल्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आलं. मात्र, सोशल मीडियावर पुन्हा सक्रिय झाल्यानंतर अनुपमाने दावा केला की, तिला चित्रपटाचं प्रमोशन करण्याची किंवा परवानगीशिवाय सोशल मीडियावर पोस्ट करण्याचीही मुभा नव्हती. तिने एक्स-बॉयफ्रेंडचं नाव न घेता त्याची तुलना विक्रमच्या ‘अन्नियन’ चित्रपटातील पात्राशी केली. दरम्यान, अनुपमाचा आगामी ‘क्रेझी कल्याणम’ हा चित्रपट १९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.