चित्रपटसृष्टीत करिअर करणं, टिकून राहणं सोपं नाही. संघर्ष तर करावाच लागतो, पण चित्रपट न मिळणं किंवा ऐनवेळी चित्रपटातून काढलं जाणं असे प्रकारही घडतात. ९० च्या दशकात एक अभिनेत्री होती, तिने अनेक सुपरहिट चित्रपट केले होते. पण एका चित्रपटात तिच्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यात आलं. याचा धक्का बसल्याने अभिनेत्री नैराश्यात गेली. काही काळाने तिने धर्मांतर केलं आणि मग काही वर्षांनी फिल्म इंडस्ट्रीला कायमचं अलविदा म्हणून परदेशात निघून गेली. तिथे आता ती अकाउंटंट म्हणून काम करतेय.
या अभिनेत्रीने ९० च्या दशकात चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. काही वर्षांतच ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री झाली. पण एक चित्रपट गमावल्यामुळे ती नैराश्यात गेली आणि नंतर अध्यात्मात रमली. हळूहळू ती ग्लॅमर विश्वापासून दूर गेली. अभिनय आणि ग्लॅमर विश्व सोडून आता ती अकाउंटंट झाली आहे. या अभिनेत्रीचं नाव मथू आहे.
माधवी म्हणून जन्म झाला, पण अभिनयविश्वात ती मथू नावाने ओळखली जायची. तिने १९९१ साली ‘अमरम’ या मल्याळम सिनेमात राधाची भूमिका केली होती. या भूमिकेतील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. एकेकाळी तिने दाक्षिणात्य इंडस्ट्री गाजवली होती. पण ‘पेरुमथाचन’ नावाच्या चित्रपटात तिच्याऐवजी मोनिषाला घेण्यात आलं आणि तिला धक्का बसला. मथू हा चित्रपट न मिळाल्याने नैराश्यात गेली.
चर्चमध्ये गेल्यानंतर ऑफर येऊ लागल्या – मथू
एका मुलाखतीत मथूने सांगितलं की ती कठीण काळातून जात असताना तिला आईने सहयामथा चर्चमध्ये नेलं होतं. नंतर तिचा अध्यात्माकडे कल वाढला. चर्चमध्ये जाऊन आल्यानंतर मथूला सिनेमांच्या अनेक ऑफर येऊ लागल्या. “पेरुमथाचन सिनेमा न मिळाल्यानंतर मला अमरमसाठी फोन आला, तेव्हा मला जाणवलं की कोणतीतरी दैवी शक्ती मला साथ देत आहे,” असं मथू म्हणाली होती.
मथूने स्वीकारला ख्रिश्चन धर्म
“आधी मला वाटलं की कोणीतरी गंमत करतंय, पण नंतर माझ्या आईने फिल्मच्या टीमबरोबर बोलून सगळी खात्री करून घेतली. यानंतर माझा येशूंवरील विश्वास वाढला. आई-वडिलांच्या पाठिंब्याने मी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि नावही बदललं,” असं ती म्हणाली. नंतर मथूने तिचं नाव बदलून मीना ठेवलं. पण चित्रपटांमध्ये ती मथू नावानेच ओळखली गेली.
मथूने ‘अमरम’मध्ये मामूटी यांच्या मुलीची भूमिका केली होती. हा तिच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट होता. हा चित्रपट हिट झाल्यावर तिने समानांतर कॉलेज, संधेशम, आयिराम मेनी, रक्तसाक्षीकल सिंदाबाद, मट्टूपेट्टी मचान अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण २००० साली मथूने प्रसिद्धीपासून दूर शांत जीवन जगण्याचा निर्णय घेतला.
दोन दशकांहून जास्त काळापासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असलेली मथू आता न्यू यॉर्कमधील लाँग आयलंड येथे राहते. मथू अकाउंटंट म्हणून काम करतेय. अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर तिने डॉ. जेकबशी लग्न केलं, पण त्यांचा घटस्फोट झाला. नंतर मथूने मलेशियाच्या अनबालागन जॉर्जशी दुसरं लग्न केलं. या लग्नापासून तिला दोन मुलं आहेत. ती आता पती व मुलांबरोबर शांततेत आयुष्य जगतेय.
