Vaazha 2 Box Office Collection : थिएटरमध्ये दर आठवड्याला नवे चित्रपट प्रदर्शित होत असतात आणि त्यापैकी काही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात आणि अनेक महिने थिएटरमध्ये टिकून राहतात. अनेकदा काही चित्रपट कोणताही गाजावाजा न करता प्रदर्शित होतात आणि बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करतात.
असाच एका मल्याळम चित्रपटाला ‘धुरंधर २’च्या जोरदार क्रेझ असताना थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
खरं तर ज्या मल्याळम चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहे, तो ‘वाझा २’ हा चित्रपट ‘धुरंधर २’ थिएटरमध्ये धुमाकुळ घालत असताना २ एप्रिल रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला रिलीज होऊन अजून फक्त १८ दिवस झाले आहेत आणि त्याची कमाई १०० कोटींच्या पुढे गेली आहे. ‘सॅकनिल्क’ च्या अहवालानुसार, केरळमध्ये सर्वात वेगाने १०० कोटींचा व्यवसाय करणारा हा चित्रपट ठरला आहे.
१०० कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा हा तिसरा चित्रपट ठरला आहे. ‘वाझा २’ने अवघ्या १६ दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार केला.केरळमध्ये सर्वात वेगाने हा आकडा गाठणारा तो तिसरा चित्रपट ठरला आहे. याआधी ‘थुडारम’ आणि ‘लोका चॅप्टर १ : चंद्रा’ या मल्याळम चित्रपटांनी केरळमध्ये १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला होता.
‘वाझा २’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘वाझा २’ च्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, चित्रपटाला प्रदर्शित होऊन १८ दिवस पूर्ण झाले आहेत आणि तो ‘धुरंधर २’ला टक्कर देत आहे. या चित्रपटाचं बजेट फक्त १० कोटी रुपये आहे, तर कमाई त्याच्या दहापट झाली आहे. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या माहितीनुसार, चित्रपटाने आतापर्यंत भारतात १२१.७३ कोटींचं ग्रॉस कलेक्शन आणि १०५.१७ कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे. तसेच १८ व्या दिवशीही चित्रपटाची कमाई सुरूच आहे.
‘वाझा २’च्या कथेबद्दल बोलायचं झाल्यास, हा एक सुपरहिट मल्याळम कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात चार मित्रांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ‘लूझर’ आणि ‘बॅकबेंचर्स’ असा शिक्का बसल्यानंतर ते सामाजिक दबावाला सामोरं जात स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.
