हिंदी आणि दाक्षिणात्य कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणाऱ्या अभिनेता कमल हसन यांची एक मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जवळपास सहा दशकांहून अधिक काळ चित्रपटदुनियेत आपलं योगदान देणाऱ्या हसन यांनीही काही कलाकारांचा आदर्श आपल्यासमोर ठेवला होता.

इतरांच्या आदर्शस्थानी असणाऱ्या या अभिनेत्याने नेमकं कोणत्या कलाकारांच्या कामाचा आदर्श ठेवला होता, या प्रश्नाचं उत्तर त्यांनीच एका मुलाखतीत दिलं आहे. मार्लन ब्रँडो यांच्यासोबतच हल्लीचे नव्या जोमाचे दिग्दर्शक म्हणजेच अॅलन पार्कर आणि स्टँन्ली क्युब्रिक यांच्या कामाची त्यांनी प्रशंसा केली. ‘एमएनप्लस’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या गोष्टींचा उलगडा केला.

‘नायकन’ या चित्रपटासाठीसुद्धा नेमकी प्रेरणा कुठून मिळाली होती, याचाही उलगडा त्याने केला. “एन्निओ मोरिक्कोन आणि सर्जिओ लिओने यांच्या ‘वन्स अपॉन अ टाइम इन अमेरिका’ या चित्रपटामुळे माझ्या अंगावर अक्षरश: काटा उभा राहिला होता. किंबहुना याच कलाकृतीने मला ‘नायकन’ साकारण्याची प्रेरणा मिळाली. लिओने यांनी एक पायंडाच घातला होता, ज्याचं अनुकरण नंतर अनेकांनीच केलं. ‘वन्स अपॉन अ….’, मध्ये मला सर्वाधिक गोष्ट भावली ती म्हणजे या चित्रपटातील कलाकारांची निवड. मुळात ही गोष्ट चित्रपटाच्या जमेची बाजू ठरली होती. ज्यांच्यामुळे चित्रपटातील संवादांपेक्षाही कलाकारांचा अभिनयच वरचढ ठरला होता”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

वाचा : #WeWantSacredGames2 : ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सिझनसाठी नेटकरी आतूर

सध्याच्या घडीला कमल हसन विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असून, चाहत्यांशी संवाद साधत आहेत. येत्या काळात ते ‘विश्वरुपम २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विश्वरुपम’चा हा सिक्वल असून, १० ऑगस्टला तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.