South Actress Madhuri Career Mohanlal Movie: बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित तर सर्वांना माहीत आहे, पण दाक्षिणात्य सिनेविश्वामध्येही एक माधुरी होती, जिने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. ८० च्या दशकामध्ये प्रचंड लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्रीने सुपरस्टार मोहनलाल यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. प्रियदर्शन यांच्या विनोदी चित्रपटातील प्रभावी भूमिकेने तिने सर्वांचे लक्ष वेधले होते. अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम करणारी माधुरी वयाच्या २७ व्या वर्षी इंडस्ट्रीतून गायब झाली.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत १९८०च्या दशकात माधुरी हे नाव चांगलंच चर्चेत होतं. वयाघ्या १६व्या वर्षी ‘पावम क्रूरन’ या मल्याळम क्राईम थ्रिलरमधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. १९८४ ते १९८७ या काळात तिने मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये जबरदस्त भूमिका साकारल्या. एका पाठोपाठ तिने सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे माधुरी ही चर्चेत होती. ८०च्या दशकामध्ये यशाच्या शिखरावर असलेल्या माधुरीने १९८५ मध्ये एका वर्षात मल्याळम व तमिळ भाषेतील तब्बल दहा चित्रपटांमध्ये काम केले.
‘बोईंग बोईंग सिनेमातून माधुरीला प्रचंड लोकप्रियता
माधुरीचा सिनेविश्वातील सर्वांत जास्त गाजलेला चित्रपट म्हणजे ‘बोईंग बोईंग.’ प्रियदर्शन यांनी दिग्दर्शन केलेला आणि मोहनलाल व मुकेश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या विनोदी चित्रपटात माधुरीने पद्मा नावाच्या एअर होस्टेसची भूमिका साकारली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि माधुरीला जबरदस्त ओळख देऊन गेला. यानंतर तिने १९८६ आणि १९८७ मध्येही मल्याळम, तमिळ व तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं. माधुरी ही रजनीकांत यांच्याबरोबर ‘मनिथन’सह अनेक चित्रपटांत झळकली होती. मात्र, नंतर तिच्या करिअरला उतरती कळा लागली.
स्टार कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर केल्यानंतर मात्र तिला सहाय्यक भूमिका मिळू लागल्या. सहाय्यक किंवा दुय्यम भूमिकांमध्ये माधुरी काम करू लागली. मुख्य चित्रपटांमधील संधी कमी झाल्यानंतर तिने बी-ग्रेड चित्रपटांमध्येही काम केले होते. अखेर १९९०च्या दशकामध्ये तिने सिनेविश्वातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कधी काळी सिनेविश्व गाजवलेल्या माधुरीने वयाच्या अगदी २७ व्या वर्षी इंडस्ट्रीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
काही रिपोर्टनुसार, माधुरीने इंडस्ट्रीमध्ये चांगले काम मिळत नसल्याने करिअर सोडून कुटुंबाला प्राधान्य देण्याचे ठरवले. तिने लंडनमध्ये स्थायिक असलेल्या अरविंद यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र, काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर माधुरी पुन्हा कधीच प्रसिद्धीमध्ये आणि चर्चेत आली नाही. सिनेविश्वामध्ये एक काळ गाजवलेली माधुरी अचानक पडद्यापासून लांब गेल्याचे गूढ तिच्या चाहत्यांमध्ये कायम राहिले.
