scorecardresearch

दाक्षिणात्य धक्के

बिग बजेट हिंदी चित्रपटांनी गेल्या वर्षीच्या दिवाळीत बंद पडलेल्या चित्रपट व्यवसायाची नव्याने सुरुवात केली.

KGF Chapter 2, KGF Chapter 2 Box Office Collection, yash, KGF Chapter 2 day 6, KGF collection, यश, केजीएफ २ बॉक्स ऑफिस कलेक्शन, केजीएफ चॅप्टर २, केजीएफ सहावा दिवस, केजीएफ फिल्म
जगभरात या चित्रपटानं आतापर्यंत कमाईचा मोठा आकडा पार केला आहे.

बिग बजेट हिंदी चित्रपटांनी गेल्या वर्षीच्या दिवाळीत बंद पडलेल्या चित्रपट व्यवसायाची नव्याने सुरुवात केली. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाने तिकीटबारीवर जोरदार कमाई करत चित्रपटसृष्टीला दिलासा दिला. प्रेक्षक या चित्रपटाने चित्रपटगृहात परतले; पण त्यानंतरच्या तीन महिन्यांत तुलनेने नावाजलेल्या कलाकारांचे बॉलीवूडपट रांगेने प्रदर्शित झाले तरी त्याचा फारसा प्रभाव तिकीटबारीवर पडला नाही. त्या तुलनेत मराठीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी चांगली कमाई केली. अगदी रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला ‘८३’ हा चित्रपटही फारशी चमक दाखवू शकला नाही. मात्र कानामागून आला आणि तिखट झाला या उक्तीप्रमाणे १७ डिसेंबरला प्रदर्शित झालेला ‘पुष्पा – द राइज’ या चित्रपटाने कमाई आणि अमाप लोकप्रियता दोन्ही स्वत:कडे खेचून घेतली. आज तशीच करामत नव्या वर्षांच्या पहिल्या चार महिन्यांत आणखी दोन दाक्षिणात्य चित्रपटांनी केली आहे. त्या तुलनेत अगदी नाव घ्यावे असे यश मिळवणारा एकही बॉलीवूडपट नसावा, इतका मोठा धक्का सध्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशाने बॉलीवूडला दिला आहे.

‘पुष्पा – द राइज’ या चित्रपटाने  ३६५ कोटींचा व्यवसाय केला, ‘आरआरआर’ चित्रपटाने १,०६३ कोटी, तर ‘केजीएफ २’ने प्रदर्शित झाल्या झाल्या तीन दिवसांत २८६ कोटींचा पल्ला पार केला आहे. त्या तुलनेत बॉलीवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा असा कोणताच चित्रपट नाही. अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘बच्चन पांडे’ हा बिग बजेट चित्रपट तिकीटबारीवर सपशेल आपटला. ‘केजीएफ २’च्या यशामुळे त्याच्याबरोबर प्रदर्शित झालेल्या ‘जर्सी’ या शाहीद कपूरची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाला शोज मिळवणेही मुश्कील झाले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांना मिळणारा प्रेक्षक प्रतिसाद हा बॉलीवूडसाठी कायमच डोकेदुखीचा विषय राहिला आहे. मात्र दाक्षिणात्य भाषांबरोबरच हिंदीत डब करून चित्रपट प्रदर्शित करण्याचे तंत्र दाक्षिणात्य चित्रपटांच्या चांगलेच पथ्यावर पडले आहे. प्रभासपाठोपाठ अल्लू अर्जुन, विजय, यश, रामचरण, ज्युनिअर एनटीआर ही दक्षिणेकडची मंडळी लोकांच्या मनात घर करू लागली आहेत. पूर्वी केवळ सलमान, आमिर, शाहरूख यांचे चित्रपट प्रदर्शित झाले की पुढचे दोन आठवडे अन्य चित्रपट प्रदर्शित केले जात नव्हते. आता हे भय दाक्षिणात्य चित्रपटांच्या बाबतीतही दाटू लागले असून बॉलीवूड कलाकारांपुढच्या अडचणींमध्ये यामुळे भर पडत चालली आहे. करोनामुळे ‘८३’ या चित्रपटाला मर्यादित यश मिळाल्याचे सांगितले गेले. ओमायक्रॉनच्या भयाने मुंबई- दिल्लीसारख्या मोठय़ा शहरांमध्ये निर्बंध होते. पन्नास टक्के क्षमतेत चित्रपटगृहे सुरू होती. रात्रीच्या खेळावरही निर्बंध आले होते. त्यामुळे ‘८३’च्या कमाईला धक्का बसला, असे दिग्दर्शक कबीर खान यांनीही सांगितले.  ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी दुसऱ्या आठवडय़ातच ‘८३’ चित्रपट १०० कोटींचा गल्ला पार करेल अशी शक्यता वर्तवली होती; परंतु तिसरा आठवडा संपता संपता कुठे चित्रपटाने एकूण १००.५६ कोटी कमावले. या प्रतिसादामुळे ‘जर्सी’सारखा चित्रपट पुढे ढकलण्यात आला. मात्र याच काळात प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा – द राइज’ या चित्रपटाला मात्र ओमायक्रॉनच्या भयाचा फटका बसलेला जाणवला नाही. २५ कोटी, १२ कोटी करत करत हा चित्रपट पुढे जात राहिला, नव्या वर्षांत चित्रपटगृहात चांगली कमाई करून हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. तरी चित्रपटगृहातील त्याचे खेळ थांबले नाहीत, इतकी लोकप्रियता या चित्रपटाने मिळवली.

त्या तुलनेत मार्चमध्ये आलेल्या एस. एस राजमौल्ली दिग्दर्शित ‘आरआरआर’ हा चित्रपट लोकप्रियतेच्या फार पुढे गेला नसला तरी कमाईच्या बाबतीत चित्रपट सुपरहिट ठरला. ‘बच्चन पांडे’सारख्या चित्रपटाला टक्कर देत त्याने १००० कोटींचा गल्लाही यशस्वीरीत्या पूर्ण केला.

‘केजीएफ : चॅप्टर २’ 

‘केजीएफ २’ हा भव्यदिव्य दाक्षिणात्य चित्रपट कधीही प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो याची चुणूक हिंदी चित्रपट निर्मात्यांना तेव्हापासूनच लागून राहिली होती. त्यामुळे जशी ‘के.जी.एफ २’च्या प्रदर्शनाची खबर अधिक पक्की होऊ लागली तशीच हिंदी चित्रपट निर्मात्यांनी आपले चित्रपट पुढे ढकलायला सुरुवात केली. करोना संक्रमणामुळे याअगोदर चार वेळा प्रदर्शनाची तारीख बदललेल्या अभिनेता आमिर खान आणि करीना कपूर यांच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाने १४ एप्रिल ही प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. मात्र तांत्रिक कारण देत हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. २०१८ साली आलेल्या ‘केजीएफ’ या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘झिरो’ या चित्रपटाला मोठी टक्कर दिली होती. त्यानंतर बॉलीवूडला दाक्षिणात्य चित्रपटांच्या स्पर्धेची भीती आहे असे चित्र रंगवण्यात आले होते. यंदाही बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या हिशोबाने ‘लाल सिंग चड्ढा’वर ‘केजीएफ २’ भारी पडेल या भीतीमुळे ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे प्रदर्शन निर्मात्यांकडून पुढे ढकलण्यात आले आहे, अशी चर्चा रंगली. या सगळय़ातून दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशाने बॉलीवूडला किती धक्के बसतायेत याची कल्पना नक्कीच येते.

ऑक्टोबर २०२१ पासून चित्रपटगृहं सुरू झाली. ‘सूर्यवंशी’, ‘भवई’, ‘बबलू बॅचलर’, ‘बंटी और बबली २’, ‘सत्यमेव जयते २’, ‘तडप’, ‘अंतिम – द फायनल ट्रुथ’, ‘चंदीगढ करे आशिकी’ आणि ‘८३’ असे गल्लाभरू बिग बजेट हिंदी चित्रपट ऑक्टोबर २०२१ ते डिसेंबर २०२१ च्या तिमाहीत प्रदर्शित झाले. त्या वेळी बॉलीवूडला खरा धक्का दिला तो दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा – द राइज’ या चित्रपटाने. तिकीटबारीवर कोटीच्या कोटी कमाई करणाऱ्या आणि प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या चित्रपटाने बॉलीवूडकरांच्या तोंडचे पाणी पळवले. त्यानंतर या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘आरआरआर’ चित्रपटाच्या १००० कोटींच्या कमाईने दुसरा धक्का बसला. लागोपाठ तिसरा धक्का ‘केजीएफ २’ या दाक्षिणात्य चित्रपटाच्या यशाने दिला आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचे हे सुपरहिट धक्के चित्रपटगृह व्यवसायासाठी आनंदाची गोष्ट असली तरी बॉलीवूडची चिंता वाढवणारी आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: South indian movies business bollywood films actors screened effect box office ysh

ताज्या बातम्या