काही वर्षांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेता धनुषचं नाव अनेकांना परिचयाचंही नव्हतं. पण, ‘कोलावरी डी’ या गाण्याने एक वेगळीच किमया केली आणि धनुष अनेकांच्या गळ्यातील ताईत झाला. संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये हे गाणं आजही आपली जागा राखून आहे. सोशल मीडियावर अनेकांनीच या गाण्याचे विविध व्हर्जन्सही सादर केले. पण, धनुषच्या अफलातून शैलीने सजलेल्या या गाण्याच्या व्हिडिओला आतापर्यंत तब्बल १२. ५ कोटी लोकांनी पाहिलं आहे. बसला ना तुम्हालाही धक्का?

सहा वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या गाण्याच्या व्ह्यूज चा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे धनुषच्या ‘कोलावरी डी’ची जादू आजही कायम आहे असंच म्हणावं लागेल. गुगल एशिया पॅसिफिकच्या संचालकांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार धनुषचं हे ‘व्हाय दिस कोला वेरी डी’ हे गाणं अल्पावधीतच ऑनलाइनवर प्रचंड गाजलं. हा शब्द तामिळ भाषिकांसोबतच इतर भाषिकांचाही आवडता झाला. यावर ऑनलाइन व्हिज्युअल कंटेंट प्रोवाडरमधील अधिकारी विद्यासागर म्हणाले की, ‘या गाण्याच्या प्रसिद्धीमुळे त्याचे इतर अनेक व्हर्जनही पाहायला मिळाले आणि प्रेक्षकांनाही ते खूप आवडले.’

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

हाती आलेल्या आकडेवरीनुसार माहिती देत ते म्हणाले, गेल्या पाच वर्षांमध्ये भारतात युट्यूबचा वापर फार वाढला आहे. ग्रामीण भागातूनही या माध्यमामध्ये बरंच योगदान दिलं जात आहे. दुर्गम भागांमध्येसुद्धा युट्यूबचा वापर बराच वाढला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
गेल्या काही वर्षांमध्ये इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता युट्यूबवरही बरेच व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते. मुख्य म्हणजे हे एक वेगळं विश्व तयार झालं असून बरेच युट्यूबर्सही नावारुपास आले आहे. पण, या सर्व गर्दीत धनुषच्या ‘कोलावरी डी’ला आजही तितकच प्रेम मिळतय ही बाब प्रशंसनीय आहे.