Nayanthara First Salary Revealing Interview: दाक्षिणात्य सिनेविश्वातील अशी एक अभिनेत्री, जिची लोकप्रियता केवळ दक्षिणेपुरती मर्यादित राहिलेली नसून देशभरात तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे; ती अभिनेत्री म्हणजे नयनतारा. जबरदस्त अभियन आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे नयनतारा आज सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. अभिनयाच्या जोरावर यश मिळवणाऱ्या नयनताराला सुरुवातीला मात्र अगदीच कमी पैसे मिळत होते.
नुकत्याच पर्ल मानीला दिलेल्या मुलाखतीत नयनताराने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगितली. सुरुवातीला अगदी काही हजार रुपये दिले जात असल्याचे तिने सांगितले. विशेष म्हणजे, नयनताराला तिच्या पहिल्या कामातून फक्त २ ते ३ हजार रुपये मिळाले होते. नयनताराला तिच्या पहिल्या नोकरीबद्दल आणि पहिल्या पगाराबद्दल विचारण्यात आलं. यावर नयनतारा म्हणाली, “मला आठवतं की, माझं पहिलं काम हे फॅशनसंबंधित होतं. बहुतेक ते वनिताच्या कव्हर शूटसाठी काम होतं.”
नयनताराला मिळालेले २ ते ३ हजार रुपये मानधन
पुढे तिला या कामासाठी फक्त २ ते ३ हजार रुपये मानधन मिळाल्याचं नयनताराने सांगितलं. यानंतर पर्ल मानीनेही तिच्या बालपणीचा एक मजेशीर किस्सा सांगितला. पर्ल म्हणाली, “माझ्या वडिलांची नखं कापण्यासाठी मला ५०० रुपये मिळाले होते.”
नयनताराने अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय आधीपासून घेतला नव्हता. तिला संधी मिळाल्यामुळे ती सिनेविश्वामध्ये आली. सुरुवातीला ती मॉडेल म्हणून काम करत होती. याच काळात दिग्दर्शक सत्यन अंतिकाड यांनी ‘वनिता’ मॅकझिनमध्ये तिचा फोटो पाहिला. त्यानंतर त्यांनी नयनताराला ‘मनसिनक्करे’ या चित्रपटाची ऑफर दिली. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून नयनताराने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
‘चंद्रमुखी’ चित्रपटातून वाढली लोकप्रियता
यानंतर तिने ‘विस्मयथुंबथु’ आणि ‘नाट्टराजावु’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. २००५ मध्ये ‘अय्या’ या चित्रपटातून तिने तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर रजनीकांत यांच्याबरोबर तिने ‘चंद्रमुखी’मध्ये काम केल्यानंतर तिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. ‘बिल्ला’, ‘माया’, ‘नानुम राउडी धान’ आणि ‘कोलामावु कोकिला’ यांसारख्या चित्रपटांमुळे ती दाक्षिणात्य सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री बनली. यानंतर तिने बॉलीवूडमध्येही स्वतंत्र ओळख निर्माण केली.
२०२३ मध्ये शाहरुख खानच्या ‘जवान’मधून नयनताराने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. आता ती ‘हाय’ या आगामी तमिळ रोमँटिक ड्रामामध्ये झळकणार आहे. विष्णू एडवन दिग्दर्शित हा चित्रपट २८ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. याशिवाय नयनतारा यशबरोबर ‘टॉक्सिक’ या सिनेमामध्येही दिसणार असून, हा चित्रपट २६ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
