साऊथ इंडस्ट्रीतील मेगास्टार चिरंजीवी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. अनेकदा ते आपल्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. चिरंजीवी यांना कॅन्सरचं निदान झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत होती. अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता खुद्द चिरंजीवी यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत आणि कॅन्सरच्या चर्चांबाबत मौन सोडलं आहे. त्यांनी ट्विट करत चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे.
चिरंजीवी यांना कॅन्सर झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून ऐकायला मिळत होत्या. उपचारानंतर त्यांचा कॅन्सर बरा झाला असेही सांगण्यात आले होते. या सगळ्या अफवा असून मला कॅन्सर झाला नसल्याचे चिरंजीवींनी ट्वीट करत स्पष्ट केलं आहे. एवढंच नाही तर अशा अफवा पसरवल्यामुळे चिरंजीवींनी संतापही व्यकत् केला आहे.




चिरंजीवींनी ट्वीटमध्ये लिहंल आहे “काही दिवसांपूर्वी कॅन्सर सेंटरचे उद्घाटन करताना मी सांगितले होते की, कॅन्सरबद्दल जनजागृती करणे आवश्यक आहे. मी हेसुद्धा सांगितलं होतं की जर तुम्ही नियमित वैद्यकीय चाचण्या केल्यास तुम्ही कर्करोग टाळू शकता. आणि त्यामुळेच मी कोलन स्कोप चाचणी केली. या चाचणीत नॉन-कॅन्सरस पॉलीप्सचं निदान झालं आणि नंतर ते काढण्यात आले. मी इतकंच म्हणालो की जर चाचणी केली नसती तर कॅन्सर झाला असता. म्हणूनच प्रत्येकाने सावध राहून चाचणी करून घेतली पाहिजे. मी एवढेच म्हणालो.”
चिरंजीवी यांनी पुढे लिहिले की, “पण माध्यमांना ते नीट समजले नाही आणि ‘मला कॅन्सर झाला’ आणि ‘उपचारांमुळे मी वाचलो’ अशा बातम्या चालवल्या. पत्रकारांनी अशा खोट्या बातम्या देऊ नयेत असे मी आवाहन करतो. विषय समजून घेतल्याशिवाय मूर्खपणाने लिहू नका. यामुळे अनेक लोक घाबरले आणि दुखावले गेले आहेत.”
चिरंजीवी यांच्या या पोस्टनंतर त्यांचे लाखो चाहते आता सुटकेचा नि:श्वास सोडताना दिसत आहेत. चाहत्यांनी चिरंजीवी यांच्या पोस्टवर कमेंट करून देवाचे आभार मानले आहेत. तसेच सत्य सांगितल्याबद्दल चिरंजीवी यांचेही आभार मानले. चिरंजीवी यांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर ते लवकरच ‘भोला शंकर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा एक ॲक्शनपट असून तमन्ना आणि किर्ती सुरेश यांच्याही या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत.