रेश्मा राईकवार
दाक्षिणात्य रिमेकच्या लाटेतला नवा हिंदी अंक म्हणजे शैलेश कोलानु दिग्दर्शित ‘हिट : द फस्र्ट केस’ हा चित्रपट. रिमेक असला तरी या चित्रपटाविषयी थोडी उत्सुकता वाटण्याचं कारण आहे तो अभिनेता राजकुमार राव. राजकुमार रावने आत्तापर्यंत नानाविध भूमिका केल्या असल्या तरी त्याला पूर्णपणे ॲक्शन अवतारात पाहण्याची संधी हा चित्रपट देतो. त्यामुळे त्या ओढीने चित्रपट पाहायचा ठरवला तरी अत्यंत रटाळ लेखन आणि संथगतीने पुढे सरकणारा हा चित्रपट मनाला कुठेच भिडत नाही.

‘हिट : द फस्र्ट केस’ हा मूळ तेलुगू भाषेतील चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. शैलेश कोलानुचीच कथा आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाच्या हिंदी रिमेकच्या दिग्दर्शनाची धुराही त्यानेच खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे कलाकारांचे चेहरे आणि चित्रीकरणाच्या जागा वगळता बाकी काही वेगळे बदल कथेत करण्यात आलेले नाहीत. चित्रपटाच्या नावातच ‘फस्र्ट केस’ हा उल्लेख केला असल्याने सिक्वलचीही व्यवस्था नीट करून ठेवलेली आहे हे सुज्ञ प्रेक्षकांना वेगळं सांगायला नको. योगायोगाने मूळ तेलुगू चित्रपटाचा सिक्वलपट म्हणजेच ‘हिट : द सेकंड केस’ याच महिना अखेरीस प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे हिंदीचा सिक्वलपटही फार लांब नसावा. तर मुळात सिक्वलपटाकडे जाण्याआधी या चित्रपटाची कथा समजून घ्यायला हवी. या चित्रपटाच्या नावातील ‘हिट’ म्हणजे ‘होमिसाईड इन्टरव्हेन्शन टीम’ या विभागातील पोलीस अधिकाऱ्याची ही कथा आहे. बाकी ‘हिट’ या शब्दाच्या इतर कुठल्याही इंग्रजी अर्थाशी त्याचा संबंध नाही. तर राजस्थानमधील कुठल्याशा शहरातून जाणाऱ्या एका महामार्गावर प्रीती नावाच्या मुलीची गाडी बंद पडली आहे. त्याच रस्त्यावरून जाणारा इब्राहिम (मिलिंद गुणाजी) हा त्या मुलीला कुठल्याही प्रकारे मदत हवी का विचारतो? मात्र आपल्या वडिलांशी इब्राहिमच्या फोनवरून संपर्क साधण्याशिवाय प्रीती कुठलीही मदत घेत नाही. त्यानंतर प्रीती तिथून गायब होते, तिची गाडी त्याच ठिकाणी उभी असलेली पाहायला मिळते. प्रीतीला शेवटचं भेटणारी किंवा त्या पूर्ण वेळेत तिला पाहणारी एकच व्यक्ती असते ती म्हणजे इब्राहिम.. त्यामुळे या पहिल्या संशयित आरोपीपासून चित्रपटाच्या कथेला सुरुवात होते. प्रीतीला कोणी गायब केलं? तिला पळवून नेण्याचं वा अपहरणाचं कारण काय असू शकतं? खरोखरच इब्राहिमने तिचा गैरफायदा घेतला आहे की तिच्या हरवण्यामागे अजून काही कथा आहे? अशा अनेक छोटय़ा-छोटय़ा प्रश्नांच्या उत्तरांची मालिका शोधत शोधत चित्रपटाची कथा पुढे सरकत जाते. एका टप्प्यावर हा तपास चित्रपटाच्या नायकाकडे म्हणजेच विक्रमकडे (राजकुमार राव) येतो. विक्रमचा स्वत:चा असा वेदनादायी भूतकाळ आहे, ज्याबद्दल तो कोणाशीच काही बोलत नाही. फक्त त्याच्या आठवणींतून, भयातून तो तुकडय़ा-तुकडय़ांत आपल्यापर्यंत पोहोचतो. या अशा भयानक भूतकाळाचं ओझं मनावर घेऊन प्रत्येक खुनाचा अगदी हुशारीने तपास करणारा विक्रम आपल्याला दिसतो. बाकी सगळा तपास हा गोलगोल आपल्याला फिरवत राहतो. त्यात प्रीतीच्या घरच्यांपासून महाविद्यालयातील मित्रमैत्रीण, शेजारीण अशा कितीतरी व्यक्तिरेखा आत येत राहतात, गुंता वाढवत जातात. हा गुंता विक्रम कसा सोडवतो?, याचीच ही कथा आहे असं ढोबळमानाने म्हणता येईल.

वर म्हटल्याप्रमाणे रहस्यमय शैलीतील हा चित्रपट असल्याने त्यातील रहस्याचं जाळं अधिकाधिक वाढवत नेणं हेच या चित्रपटाचं वैशिष्टय़ आहे. मात्र या रहस्याला जो मूळ कथेचा आधार आहे किंवा संदर्भ आहे तो फारच पोकळ वाटतो. डोंगर पोखरून उंदीर काढावा तशी आपली अवस्था होते. बरं त्यातला थरार अंगावर यावा तर तशी फार भयानक मांडणीही नाही. एकूणच अशा पध्दतीच्या दाक्षिणात्य चित्रपटांची मांडणी ही बहुतांशी वेळा अतिशयोक्ती वा रंजकतेने केलेली असते. इथे तोही मामला नाही. फार सरळसोट पध्दतीने पण अत्यंत संथ वेगाने तपासकथा सुरू राहते. त्याला नाही म्हणायला थोडीशी राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा या मुख्य जोडीची प्रेमकथा तोंडी लावण्यापुरती वा एखाददुसऱ्या गाण्यापुरती येते. विक्रमच्या भूतकाळाशी काही या घटनेचा संदर्भ आहे का? तर तसंही होत नाही. कटप्पाने बाहुबली को क्यों मारा? अशा थाटात प्रश्न पाडणारीही कथा नाही. त्यामुळे एक व्यक्ती हरवली आहे इथपासून ते तिचं नेमकं काय झालं? याचं उत्तर मिळवेपर्यंतचा प्रवास म्हणजे ही पहिली केस वा चित्रपट एवढंच फार ते म्हणता येईल.

चित्रपटात काही खूप चांगले कलाकार आहेत. बऱ्याच काळाने त्यांना पडद्यावर पाहण्याची संधी चित्रपटाने दिली असली तरी प्रत्यक्षात त्या व्यक्तिरेखांना फारसं काही कामच दिलेलं नाही. मििलद गुणाजी, संजय नार्वेकर हे दोन मराठमोळे चेहरे आणि दलीप ताहिलसारखा उत्तम अभिनेता, कित्येक काळाने पडद्यावर दिसलेली शिल्पा शुक्ला असे काही चांगले कलाकार चित्रपटात आहेत. नाही म्हणायला मिलिंद गुणाजीपासून कथेला सुरुवात होते, त्यामुळे किमान त्याची तरी काही खास भूमिका पाहायला मिळेल, अशी आपल्या मनात उत्सुकता दाटते. मात्र प्रत्यक्षात हे कलाकार अगदी त्यांच्या महत्त्वाच्या वाटतील अशा व्यक्तिरेखांच्या किरकोळ मांडणीत हरवून जातात. राहता राहिला प्रश्न राजकुमार रावचा.. त्याच्या नेहमीच्या सहजतेने त्याने अॅक्शन अवतारही पूर्ण मनापासून साकारण्याचा प्रयत्न केला आहे. पण कथाच प्रभावी नाही, त्यामुळे त्याचा पोलीस अधिकारीही फिकाच पडतो. ‘हिट’ची ही पहिली केस तरी चांगलीच ढेपाळली आहे. दुसऱ्या केसमध्ये तरी किमान त्याचा भूतकाळ उलगडतो की नाही हे पाहायला हवं.. म्हणजे तसं गाजर तरी दिग्दर्शकाने दाखवलं आहे. पण तिथेही निराशाच पदरी पडण्याची शक्यता जास्त वाटते.
हिट : द फस्र्ट केस
दिग्दर्शक – शैलेश कोलानु, कलाकार – राजकुमार राव, सान्या मल्होत्रा, मिलिंद गुणाजी, संजय नार्वेकर, दलीप ताहिल, शिल्पा शुक्ला.