Suriya Mumbai House Jyothika : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार सूर्या आणि त्याची पत्नी ज्योतिका करोना काळात चेन्नई सोडून मुंबईत स्थायिक झाले आहेत. ज्योतिकाच्या आई-वडिलांच्या जवळ राहता यावे आणि तिचे बॉलीवूडमधील करिअर पुन्हा सुरू व्हावे, यासाठी सूर्याने हा मोठा निर्णय घेतला. आगामी ‘विश्वनाथ अँड सन्स’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान बोलताना सूर्याने स्पष्ट केले की, चेन्नईतील आलिशान बंगला सोडून मुंबईतील १,७०० स्क्वेअर फूटच्या लहान घरात राहणे त्याला एखाद्या सुट्टीसारखे वाटते. सह-कलाकार राधिका सरथकुमार यांनीही सूर्याच्या या साध्या आणि समाधानी आयुष्याचे कौतुक केले आहे.

सूर्याच्या सह-कलाकार राधिका सरथकुमार म्हणाल्या, “त्याला तिथे राहायला खूप आवडतं. ज्योतिकाने मला सांगितलं की सूर्याला मुंबईत खूप आवडतं. तिथे गेल्यानंतर सर्वात आधी तो विचारतो- माझा धोबी कुठे आहे, माझे कपडे इस्त्री करणारा माणूस कुठे आहे, माझे शूज कुठे आहेत? तो स्वतः कॉफी बनवतो. तो सर्व कामं स्वतः करतो. मी तिथे गेल्यावर हे स्वतः पाहिलंय. तिथे तो खूप समाधानी असतो.”

मुंबईत राहणं म्हणजे सुट्टीसारखं – सूर्या

मुंबईत राहायला का आवडतं? याबद्दल सूर्या म्हणाला, “माझ्यासाठी मुंबईत राहणं म्हणजे एखाद्या सुट्टीवर असल्यासारखं आहे. मी इथे चेन्नईत काम करतो आणि तिथे सुट्टीसाठी जातो. मुंबईतलं घर खूप लहान आहे. आम्ही १,७०० स्क्वेअर फूटाच्या घरात राहतो. त्यामुळे दोन पावलं चाललो की बेडरूम, दोन पावलांवर लिव्हिंग रूम, दोन पावलांवर किचन आणि दोन पावलांवर डायनिंग एरिया आहे. हे खूप छान वाटतं. तिथे खूप साऱ्या आठवणी आणि भरपूर प्रेम आहे. मला दिया किंवा देवला हाक मारायची असेल तर ते फक्त एका पावलाच्या अंतरावर असतात. तिथे आम्ही काय करतो हे फार लोकांना माहीत नाही, त्यामुळे ते खूप छान वाटतं.”

पुढे राधिका सरथकुमार म्हणाल्या, “ज्योतिका आणि मी खूप बोलत असतो. ती खूप खूश आहे आणि तिचा हा आनंद तिच्या कौटुंबिक आयुष्यातही दिसून येतो. त्यामुळे सूर्याही खूश आहे. कधीकधी मी त्याला विचारते की तू मुंबईत जाऊन का राहतेस? तेव्हा ती म्हणते, ‘मी तिथे खूप खूश आहे.'” त्यावर सूर्या म्हणाला, “ती काही रशिया किंवा जपानला गेलेली नाही, तर तिच्या स्वतःच्या आईच्या घरी गेली आहे. तिचं प्राधान्य तिच्या आई-वडिलांना वेळ देणं आणि काम करणं हेच होतं.”

सूर्या आणि ज्योतिका यांनी काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ११ सप्टेंबर २००६ रोजी चेन्नईमध्ये लग्न केलं. या दांपत्याला २००७ मध्ये दिया ही मुलगी आणि २०१० मध्ये देव हा मुलगा झाला.