Actor Yash Fan Suicide Controversy Aap Ki Adalat: दाक्षिणात्य स्टार अभिनेता यश आगामी ‘रामायण’ सिनेमामुळे चर्चेमध्ये आला आहे. टीझरमध्ये रावणाच्या भूमिकेतील त्याच्या जबरदस्त अभिनयानं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलं. दाक्षिणात्य सिनेविश्वातून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या यशचा संपूर्ण देशामध्ये मोठा चाहता वर्ग आहे. मात्र, त्यातील काही चाहत्यांच्या वागणुकीमुळे यश अडचणींमध्ये आला होता. यश न भेटल्यामुळे त्याच्या एका चाहत्यानं आत्महत्या केली होती.
अभिनेता यश ‘आप की अदालत’मध्ये सहभागी झाला असून, यावेळी त्यानं चाहत्यांच्या फॅन कल्चरबद्दल चिंता व्यक्त केली. त्यानं वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना भेटणं पूर्णपणे बंद केल्याचं सांगितलं. चाहत्यांच्या अतिउत्साहीपणामुळे (फॅनॅटिझम) एक दुर्दैवी घटना घडली होती. यशची भेट न झाल्यामुळे एक चाहत्यानं आत्महत्या केल्याचा प्रसंग घडला होता. तसेच चिठ्ठीमध्ये यशचं नावसुद्धा लिहिलेलं होतं. यश म्हणाला, “सुरुवातीला चाहत्यांना भेटत होतो; पण नंतर जसजशी लोकप्रियता वाढत गेली, तसतशा अशा काही घटना घडत गेल्या, ज्यामुळे चाहत्यांना भेटणं मी बंद केलं आहे.”
यशच्या वाढदिवशी काय घडलेलं?
२०२१ मध्ये एका चाहत्यानं यशच्या वाढदिवशी अभिनेत्याची भेट न झाल्यानं आत्महत्या करून चिठ्ठीमध्ये त्याचं नाव लिहिलं होतं. त्याबद्दल यश म्हणाला, “२०२१ मध्ये वाढदिवसाच्या दिवशी मी घरी नव्हतोच. माझ्या खूप जवळची व्यक्ती ज्येष्ठ अभिनेते अंबरीश यांचं त्याच वर्षी निधन झालं होतं. त्यामुळे मला वाढदिवस साजरा करण्याची इच्छा नव्हती; पण तरीही चाहते माझ्या घराबाहेर जमा झाले. त्यांना वाटलं की, मी घरी असूनही त्यांना भेटण्यासाठी बाहेर येत नाहीये; पण त्या दिवशी मी घरी नव्हतोच.”
यशच्या तीन चाहत्यांचा मृत्यू
पुढे तो म्हणाला, “वाढदिवासाच्या दिवशीही मी न भेटल्यामुळे एका चाहत्यानं स्वतःला पेटवून घेतलं आणि आत्महत्या केली. मला याचं खूप वाईट वाटलं. त्याच्या पुढच्या वर्षी माझा बॅनर लावताना एका चाहत्याचा हात तुटला. त्यानंतर अशाच एका घटनेत आणखी तीन चाहत्यांचा मृत्यू झाला. अशा सर्व घटनांमुळे मी चाहत्यांना भेटणं बंद केलंय. आता मला अशा घटनांची खूप भीती वाटते. माझ्या फॅन्सनी फक्त माझा सिनेमा पाहिला तरी पुरेसं आहें”
चाहत्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं यशचं नाव
आत्महत्या केलेल्या त्या चाहत्यानं त्याच्या सुसाईड नोटमध्ये यश आणि तत्कालीन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, यश त्याच्या अंत्यसंस्काराला गेला नाही. याचं कारणही त्यानं सांगितलं. यश म्हणाला, “मी तिथे गेलो असतो, तर अनेकांना वाटलं असतं की, त्यांनीही असंच काही केलं, तर मी तिथे येईन. ही मानसिकताच चुकीची आहे. त्याच्या अंत्यसंस्काराला जाऊन मला काय मिळणार होतं? मला दुःख झालं होतं. मला वाईट वाटलं होतं; पण माझा विचार असा आहे की, मी तिथे गेलो, तर पुढेही लोकांनी असंच काहीतरी केलं असतं.”
तर चाहत्यांचा आई-वडिलांचा शाप लागेल – यश
अशा घटनांमुळे चाहत्यांच्या प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलल्याचं यशनं सांगितलं. तो म्हणाला, “अशा घटनांमुळे मी चाहत्यांना भेटणं टाळत असतो. माझ्यामध्ये अहंकार आहे म्हणून नाही, तर अशा घटना घडू नयेत म्हणून मी हे टाळतो. त्यांना माझा सिनेमा आवडला नाही तरी काही हरकत नाही, मी त्यासाठी अजून प्रयत्न करेन; पण चाहत्यांनी स्वतःचं आयुष्य, आई-वडिलांनी आयुष्यभर गुंतवलेला वेळ, मेहनत आणि त्यांच्या अपेक्षा वाया घालवू नये. चाहत्यांना काही झालं, तर त्यांच्या आई-वडिलांचा शाप आम्हाला लागेल. त्यांनी नक्कीच प्रेम करावं; पण माझ्या स्टारडममध्ये किंवा यशामध्ये इतकं गुंतून जावं, असं मला वाटत नाही. त्यातून चाहत्यांना काय मिळणार आहे?”
स्टार यशचे येणाारे आगामी चित्रपट
दरम्यान, कन्नड सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता यशच्या ‘केजीएफ’मधील प्रभावी अभिनयाचं कौतुक झालं होतं. त्यानंतर लवकरच तो नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ सिनेमामध्ये रावणाची भूमिका साकारणार आहे. तसेच त्याचा ‘टॉक्झिक’ सिनेमा २६ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.
