Ram Charan and Upasana Konidela Welcomed Twins A Baby Boy And Girl : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच राम चरणचे वडील मेगास्टार चिरंजीवी यांनी राम चरण व त्याची पत्नी उपासना कामिनेनी यांना जुळी मुलं झाल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती.

राम चरण व उपासना यांच्या लग्नाला आता जवळपास १४ वर्षे झाली आहेत. लग्नानंतर ११ वर्षांनी उपासनाने २० जून २०२३ रोजी गोंडस मुलीला जन्म दिला. क्लिन कारा कोनिडेला असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. त्यानंतर आता राम चरण व उपासना दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. या दोघांना जुळी मुलं झाल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

राम चरण याने हैदराबादमध्ये त्याच्या निवासस्थानी नामकरण समारंभ आयोजित केला होता. यावेळी अभिनेत्याने त्याच्या जुळ्या मुलांची नावं जाहीर केली. रामने मुलाचं नाव ‘शिवराम’ असं ठेवलं असून त्याने आपल्या मुलीचं नाव ठेवलंय ‘अन्वीरा देवी’.

व्हरायटी इंडियाशी बोलताना, राम चरणने या नावांमागील अर्थ स्पष्ट केला आहे तो म्हणाला, “शिवराम आणि अन्वीरा देवी ही नावं ठेवण्यामागे आध्यात्मिक कारण आहे. उपासना आणि मी आम्ही दोघांनी यासाठी खूप विचार केला होता. भगवान शिव व राम यावरून मुलाचं नाव आम्ही शिवराम असं ठेवलंय. ‘शिव शंकर वर प्रसाद’ हे माझ्या वडिलांचं जन्मनाव सुद्धा आहे तर, आम्ही त्यावरून आमच्या मुलांचं नाव ठेवलंय. यासह आमच्या मुलीचं नाव अन्वीरा देवी ठेवलंय…अन्वीरा देवी म्हणजे अमर्याद धाडस आणि दैवी स्त्रीशक्तीचं प्रतीक. दोघांची ही नावं केवळ त्यांची ओळख नाहीत, तर शक्ती, प्रेम आणि धैर्याचं प्रतीक आहेत.”

उपासना दुसऱ्यांदा आई होण्याबद्दल म्हणाली, “बाळांचा जन्म होऊन आता फक्त एक आठवडा झाला आहे. मी आता जास्त काही बोलू इच्छित नाही. पण, माझ्या तिन्ही मुलांना एकत्र पाहून मला खूप छान वाटतंय.”

दरम्यान, राम चरण तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. वैयक्तिक आयुष्यात राम चरण व उपासना कामिनेनी यांचा साखरपुडा डिसेंबर २०११ मध्ये झाला होता. त्यानंतर १४ जून २०१२ रोजी हैदराबादमध्ये त्यांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं.