दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार्स नेहमी चर्चेत असतात. कधी त्यांच्या कामामुळे तरी कधी वैयक्तिक आयुष्यामुळे दाक्षिणात्य सुपरस्टार्स चर्चेत असतात. नुकत्याच एका दाक्षिणात्य सुपरस्टारने आनंदाची बातमी दिली आहे. या सुपरस्टारचं दीड वर्षांपूर्वी इटलीमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं. त्यानंतर आता हा सुपरस्टार लवकरच बाबा होणार असल्याचं समोर आलं आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार वरुण तेजच्या घरी पाळणा हलणार आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक छानसा फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. त्यामुळे सध्या वरुण तेजवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे.
वरुण तेजने १ नोव्हेंबर २०२३ मध्ये अभिनेत्री लावण्या त्रिपाठीशी लग्नगाठ बांधली होती. इटलीमध्ये मोठ्या थाटामाटात वरुण व लावण्याचं लग्न झालं होतं. या लग्नासाठी अल्लू अर्जुनपासून ते राम चरणपर्यंत अनेक दाक्षिणात्य सुपरस्टार्स इटलीमध्ये आपल्या कुटुंबियांबरोबर खास उपस्थित राहिले होते. वरुण व लावण्याच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. आता लग्नाच्या दीड वर्षांनंतर वरुण व लावण्या आई-बाबा होणार आहेत.
“आयुष्यातील आतापर्यंतच्या सर्वात सुंदर भूमिका लवकरच येत आहे,” असं कॅप्शन लिहित वरुण तेजने बाबा होणार असल्याची खुशखबर दिली आहे. फोटोमध्ये, वरुण व लावण्याने एकमेकांचा हातात हात पकडून दोघांनी लहान बाळाचे शूज पकडले आहेत. याच फोटोवर हार्ट इमोजी लावला आहे. वरुणने खुशखबर देताच इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग, अदिती हैदरी, अदिती हैदरी, समांथा रुथ प्रभू अशा अनेक कलाकारांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
दरम्यान, २०१७ साली ‘मिस्टर’ या चित्रपटाच्या सेटवर वरुण व लावण्याची पहिल्यांदा भेट झाली. या तेलुगू चित्रपटादरम्यान दोघांची चांगली मैत्री झाली अन् मग त्याचं प्रेमात रुपांतर झालं. वरुणने २०१४ साली ‘मुकंदा’ या चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर ‘फिदा’, ‘कांचे’, ‘लोफर’ आणि ‘F3: फन अॅण्ड फ्रस्टेशन’ यांसारख्या चित्रपटामुळे त्याला लोकप्रियता मिळाली. लावण्याने तामिळ, तेलुगूमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती ‘डूसुकेल्था’, ‘ब्रम्मन’ आणि ‘हॅप्पी बर्थडे’ यांसारख्या बऱ्याच चित्रपटात झळकली आहे.