Toxic Movie Earned 600 Crore Before Release : अभिनेता यश आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या ‘Toxic: A Fairy Tale for Grown-Ups’ या आगामी चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही; पण चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच बक्कळ कमाई केली आहे.
ज्येष्ठ चित्रपट निर्माते डॉ. जी. धनंजयन यांनी सांगितल्याप्रमाणे, चित्रपटाने रिलीजपूर्वीच जवळपास ६०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. Cinema Strategist या कार्यक्रमात बोलताना जी. धनंजयन यांनी सांगितले की, हा आकडा आश्चर्यकारक नाही. यशच्या स्टारडमपेक्षा चित्रपटासाठी केलेले योग्य नियोजन केल्याचा हा परिणाम आहे.
‘टॉक्झिक’ चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कमावले ६०० कोटी
जी. धनंजयन म्हणाले, “या चित्रपटाने प्री-रिलीज व्यवसायातून जवळपास ६०० कोटी कमावले आहेत. ही कमाई विचारपूर्वक आखलेल्या रणनीतीमुळे शक्य झाली आहे.” धनंजयन यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाच्या यशाची सुरुवात त्याच्या कलाकारांच्या कास्टिंगमुळे झाली. प्रत्येक कलाकाराची निवड ठरावीक प्रेक्षकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आली आहे.
पुढे म्हणाले, “या चित्रपटात नयनतारा, रुक्मिणी वसंत, मल्याळम अभिनेता टोविनो थॉमस व अमित करवाल यांसारखे कलाकार आहेत. नयनताराला ‘जवान’ चित्रपटानंतर देशभरात लोकप्रियता मिळाली आहे. ‘कांतारा’नंतर रुक्मिणी वसंतही प्रसिद्ध झाली आहे. त्याचा फायदा चित्रपटाला झाला आहे.”
धनंजयन यांच्या मते, खरा ‘पॅन-इंडिया’ चित्रपट म्हणजे फक्त दक्षिणेकडील चित्रपट डब करून देशभर प्रदर्शित करणे नव्हे. तर, सुरुवातीपासूनच संपूर्ण भारतातील प्रेक्षकांना लक्षात घेऊन चित्रपट तयार करणे महत्त्वाचे असते. “संपूर्ण भारताला आकर्षित करणारा चित्रपटच खऱ्या अर्थानं पॅन-इंडिया असतो. फक्त एका राज्यातील स्टार घेऊन त्याला पॅन-इंडिया चित्रपट म्हणणे योग्य नाही,” असे ते स्पष्टपणे म्हणाले.
‘धुरंधर २’ अन् ‘टॉक्झिक’ एकाच दिवशी होणार रिलीज
यावेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही त्यांनी सांगितली. ‘टॉक्झिक’ हा चित्रपट येत्या १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी ‘धुरंधर २’चा सीक्वेलही रिलीज होत आहे. दोन्ही बिग बजेट आणि बहुप्रतीक्षित चित्रपट एकाच दिवशी रिलीज होत आहेत. धनंजयन यांना यात काही धोका वाटत नाही. ते म्हणाले, “योग्य नियोजन करूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे. स्पर्धेला घाबरण्याऐवजी चित्रपटाची ताकद दाखवण्याचा हा प्रयत्न आहे.”
धनंजयन यांच्या मते, ‘टॉक्झिक’ने रिलीजपूर्वीच जे नियोजन केलं आहे, ते अनेक पॅन-इंडिया चित्रपटांना शक्य झालं नव्हतं. कलाकारांची निवड आणि प्रदर्शनाआधीची कमाई यांमुळे हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. मात्र, चित्रपटाच्या कमाईचं अंतिम यश हे प्रेक्षकांच्या प्रतिसादावरच ठरणार आहे, जे १९ मार्चनंतर स्पष्ट होईल.
