बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षयचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘सुर्यवंशी’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह सुरु होतील अशी घोषणा केली आहे. त्यानंतर अक्षयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांचे आभार मानले आहे. मात्र, यावेळी छत्तीसगडचे स्पेशल डीजीपी आर के विज यांनी कमेंट करत अक्षयला ट्रोल केले आहे.

अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. अक्षयने हे ट्वीट शेअर करत एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी दिसत आहेत. ‘आता अनेक कुटुंब उद्धव ठाकरे यांचे आभार मानतील! २२ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्याबद्दल आभारी आहे. आता कोणी थांबल तरी नाही थांबणार – पोलीस येत आहेत’, असे कॅप्शन अक्षयने त्या फोटोला दिले आहे.

अक्षयने शेअर केलेल्या या फोटोत दिसत आहे की इन्स्पेक्टरची भूमिका साकारणारा रणवीर सिंग टेबलवर बसलेला आहे तर अक्षय कुमार आणि अजय देवगण, जे वरिष्ठ अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत ते उभे आहेत. अक्षयचे हे ट्वीट पाहिल्यानंतर छत्तीसगडचे स्पेशल डीजीपी आर के विज यांनी त्याला ट्रोल केले आहे. ‘इन्स्पेक्टर साहेब बसले आहेत आणि एसपी साहेब उभे आहेत, हे असे होत नाही, साहेब,’ अशा आशयाचे ट्वीट डीजीपी आर के विज यांनी केले आहे. त्यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

तर स्पेशन डीजीपी आर के विज यांच्या ट्वीटला उत्तर देत अक्षय म्हणाला, ‘जनाब, हा तर बिहाइंड द सीनचा फोटो आहे. आम्ही कलाकारांसाठी, जसाच कॅमेरा सुरु झाला, तो परत प्रोटोकॉलवर आला. आमच्या महान पोलीस दलांना सलाम. आशा आहे की जेव्हा तुम्ही चित्रपट पाहणार तेव्हा तुम्हाला नक्कीच आवडेल.’

आणखी वाचा : “आम्ही दोघांनी अजुन लग्न केले नाही…”,सलमान खानने केला त्याच्या रिलेशनशिपचा खुलासा

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी ३’ तृप्ती देसाई आणि शिवलीला पाटील यांच्यात इंदुरीकर महाराजावरून वाद

अक्षय कुमारच्या ‘सुर्यवंशी’ या चित्रपटात कतरिना कैफ मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी २४ मार्च २०२० रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र, करोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाला पाहता चित्रपट प्रदर्शनाचा तारिख पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.