अनुराग कश्यप हे नाव आपण घेतलं की आपल्या डोळ्यासमोर येतात त्याच्या खास अनुराग स्टाईलने दिग्दर्शित केलेले चित्रपट. मग त्याचा कुठलाही सिनेमा हा त्याच्या खास ट्रिटमेंटसाठी ओळखला जातो. यशस्वी होऊनही ज्यांचे पाय जमिनीवर आहेत अशा दिग्दर्शकांमध्ये अनुराग कश्यपची गणना होते. याच अनुरागचा आज वाढदिवस आणि त्याच निमित्ताने हा लेखप्रपंच. सत्या सिनेमातून तो आला आणि नंतर त्याने सिनेमा हेच आपलं सर्वस्व मानून वाटचाल सुरू केली. आपल्याला रुचलेल्या वाटेने जाणारे दिग्दर्शक काहीसे वेगळेच असतात. अनुरागने हे वेगळेपण कायमच सिद्ध केलं आहे.

‘सत्या’ सिनेमासाठी पटकथा लेखन

रामगोपाल वर्माचा सत्या हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतला कल्ट मानला जातो. रामूच्या या सिनेमासाठी पटकथा लेखन केलं होतं ते अनुराग कश्यपने. सत्या हा सिनेमा १९९८ मध्ये आला होता. मुंबईत लोकांच्या भाऊगर्दीत आलेला एक सामान्य माणूस हा गँगस्टर कसा बनतो, त्याचा शेवट कसा होतो? हे सगळं या सिनेमात अत्यंत वेगळ्या पद्धतीने रेखाटण्यात आलं होतं. या सिनेमाची विशेष बाब म्हणजे सिनेमा सत्या या नावाने ओळखला गेला असला तरीही यातला भिकू म्हात्रे म्हणजेच मनोज वाजपेयी हा सिनेसृष्टीतला अजरामर झालेला रोल आहे. भिकू म्हात्रे ज्याने साकारला त्याच मनोज वाजपेयीने रामगोपाल वर्मा आणि अनुराग कश्यप यांची भेट घालून दिली होती. त्यावेळी रामूने अनुरागला विचारलं की तुला माझा कुठला सिनेमा आवडतो, ज्यावर अनुरागने उत्तर दिलं होतं कुठलाच नाही. पहिल्याच भेटीत रामूला असं उत्तर अनुरागने दिलं तेव्हा मनोज वाजपेयीला कुठे तोंड लपवू असं झालं होतं. हा भन्नाट किस्सा अनुरागनेच एका मुलाखतीत सांगितला होता. पण सत्या तयार झाला आणि त्या सिनेमाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी अनुराग कश्यपला स्क्रिन पुरस्कारही मिळाला.

chaya kadam
‘प्रथितयश दिग्दर्शकांचा नवोदितांना पाठिंबा हवा’
Nach Ga Ghuma Movie poster
नाच गं घुमा! मोलकरणीचंच नाही माणुसकीचं ‘मोल’ सांगणारा चित्रपट
swargandharva sudhir phadke movie review by loksatta reshma raikwar
Swargandharva Sudhir Phadke Movie Review : तोच चंद्रमा नभात…
naach ga ghuma marathi movie review by reshma raikwar
Naach Ga Ghuma Movie Review : मार्मिक घुमाख्यान
aajji bai jorat marathi play for kids based on artificial intelligence
आज्जीबाई जोरात
Marathi Theatre Classic, All the Best play, 50th show within three months, All the Best play Return, all the best return with new actors, marathi theatre, Shivaji mandir, theatre, marathi plays,
नव्या संचातील ‘ऑल द बेस्ट’चा ५० वा प्रयोग, तीन महिन्यांत ५० व्या प्रयोगापर्यंत वाटचाल
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
future of ai self awareness
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता स्वजाणिवेचे भवितव्य काय?
सत्या सिनेमातलं दृश्य
(फोटो सौजन्य-फेसबुक)

सत्या सिनेमात खरंतर सत्या हा हिरो होता.. मात्र चर्चा झाली भिकू म्हात्रेची. मनोज वाजपेयीने साकारलेली ही भूमिका आजही आपल्या मनात घर करून गेली आहे. भिकू हे नाव रामगोपाल वर्माकडे जो केअरटेकर होता त्याचं होतं. त्यावरून हे नाव अनुरागने आपल्या कॅरेक्टरला दिलं. मनोज वाजपेयीने या भूमिकेत आपल्या खास अभिनयाचे रंग भरले. यानंतर अनुरागने कौन, शूल या सिनेमांसाठीही लेखन केलं. शूलचा दिग्दर्शक रामू नव्हता. पण संवाद आणि पटकथा ही अनुराग कश्यप आणि रामगोपाल वर्माने लिहिली होती. वर्मा प्रॉडक्शनचाच हा सिनेमा होता.

कधीही प्रदर्शित न झालेला अनुराग कश्यपचा पहिला सिनेमा

रामगोपाल वर्मापासून नंतर वेगळं होत अनुराग कश्यपने पहिला सिनेमा केला तो पाँच नावाचा. हा सिनेमा अजूनही प्रदर्शित झालेला नाही. हा सिनेमा महाराष्ट्रात गाजलेल्य बहुचर्चित जोशी अभ्यंकर खटल्यावर आधारीत होता. सिनेमात दाखवण्यात आलेली हिंसा, नशा आणणाऱ्या पदार्थांच्या सेवनाचे प्रसंग यावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. काही कट्स सुचवत नंतर सेन्सॉरने सिनेमाला मान्यता दिली. पण सिनेमा निर्मात्यांकडे पैसे उरले नसल्याने प्रदर्शित होऊ शकलेला नाही. हा सिनेमा युट्यूबवर उपलब्ध आहे. सिनेमा हे माध्यम कसं वापरायचं हे अनुरागला किती आधी समजलं होतं ते हा सिनेमा पाहिल्यावर कळतं.

ब्लॅक फ्रायडे आणि निर्माण झालेला वाद

ब्लॅक फ्रायडे या २००७ मध्ये आलेल्या सिनेमाने तर कहरच केला. मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटांवर आधारीत हा सिनेमा होता. या सिनेमात बॉम्बस्फोटाचं ओरिजनल फुटेजही वापरण्यात आलं होतं. तसंच अनेक नावंही जी आहेत तीच वापरण्यात आली होती. याबाबत इंडियन एक्स्प्रेसच्या मुलाखतीत अनुराग म्हणाला होता की जी खरी नावं तुम्हाला या सिनेमात आढळतात ती तशीच्या तशी घ्यायची नसतात हे मला तेव्हा माहितच नव्हतं. मी चुकून ती सगळी नावं ठेवली आणि तुम्हाला वाटलं की मी खूप मोठी हिंमत केली. या सिनेमातले अनेक प्रसंग आजही अस्सल वाटतात आणि त्याचं संपूर्ण श्रेय जातं ते अनुराग कश्यपला. अगदी स्फोट झाल्यानंतर कानठळ्या बसवून सुन्न करणारा जो आवाज आहे तो देखील त्याने खूप छान टिपला आहे. एवढंच काय तर बॉम्बस्फोटातले आरोपी पकडे जाणं. बादशाह खान आणि राकेश मारिया यांच्यातला संवाद, पोलिसांनी स्फोटातल्या आरोपींनी कसं पकडलं? टायगर मेमनने बॉम्बस्फोटांचा कट कसा आणि का रचला?या सगळ्याची उत्तरं अनुरागने या सिनेमात दिली आहेत.

ब्लॅक फ्रायहे हा अनुराग कश्यपचा मास्टरपीस आहे. (फोटो सौजन्य-फेसबुक)

देवदासच्या कहाणीला दिलेली खास ट्रिटमेंट

आपल्या धाटणीचे सिनेमा घेऊन अनुराग कश्यप त्याची त्याची वाटचाल करत होता आणि अजूनही करतो आहे. देव डी. हे देवदासचं मॉडर्न व्हर्जन होतं. अभय देओल कल्की कोचलिन आणि माही गिल यांच्या या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका होत्या. शरतचंद्रांनी जो देवदास लिहिला त्यात त्याचं पारोसाठीचं झुरणं आणि व्यसनाधीन होणं दाखवलं होतं. तो देवदास ही शोकांतिका होती. मात्र अनुराग कश्यपने त्यावरुन प्रेरणा घेत तयार केलेला देव डी हा आजच्या काळातला नायक प्रेयसी आयुष्यातून निघून गेली तर काय करेल यावर भाष्य करणारा होता. आजचा कुठलाही तरूण शरतचंद्रांच्या कादंबरीप्रमाणे झुरत बसणार नाही तो पर्याय शोधेल.. आणि २००९ मध्ये अनुरागने आणलेल्या या सिनेमात नेमकं हेच अनुरागनं दाखवलं. या सिनेमाला दिलेली ट्रिटमेंट हा देखील चर्चेचा विषय ठरला होता. यानंतर अनुराग कश्यपचा गुलाल हा सिनेमाही चर्चेत होता. महाविद्यालयांमधल्या निवडणुका, राजस्थानची पार्श्वभूमी तिथे आपसात असणाऱ्या दोन दिग्गजांचं वैर हे सगळं कुठल्या थराला जाऊ शकतं ते अनुरागने एखाद्या नग्न सत्यासारखं दाखवलं होतं. पियूष मिश्रांनी या सिनेमात म्हटलेली दोन गाणी आरंभ है प्रचंड आणि ओ री दुनिया.. हीदेखील आजही प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारी ठरतात.

गँग्स ऑफ वासेपूरचं घवघवीत यश

अनुराग कश्यप पटकथा लेखन, दिग्दर्शनासह हे प्रयोग करतच होता. मात्र त्याच्या आयुष्यात हव्या असणाऱ्या हिट सिनेमाचा शोध संपत नव्हता जो संपला गँग्ज ऑफ वासेपूर पार्ट १ आणि पार्ट २ या सिनेमांमुळे. दोन भागांमध्ये तयार झालेला हा सिनेमा आणि सिनेमात असलेल्या सरदार सिंगच्या सुडाचा धागा. त्याला असणारी झारखंड, धनबादमधल्या संघर्षाची फोडणी, कोळशाइतकंच काळं असलेलं तिथलं राजकारण आणि त्यानंतर होत गेलेले बदल हे जे काही अनुराग कश्यपने केलं त्याला केवळ कमालच म्हणता येईल. शिव्यांचा प्रचंड भडीमार, मोठ्या प्रमाणावर हिंसा मनोज वाजपेयी, तिग्मांशू धुलिया, पंकज त्रिपाठी, नवाजुद्दीन सिद्दीकी, हुमा कुरेशी, जीशान कादरी यांच्यासारख्या कलाकारांची फौज. १९४२ ते २००५ पर्यंत काय काय घडलं ते सांगणारी ही गोष्ट लोकांना खूपच आवडली. देशी मातीतला गॉडफादर असं या सिनेमाचं वर्णन करता येईल.

गँग्ज ऑफ वासेपूरच्या एका दृश्यात मनोज वाजपेयी आणि तिग्मांशू धुलिया

सिनेमा दोन भागांमध्ये आला होता.. सिनेमाचं एडिटिंग, हिंसेचे प्रसंग, हाणामाऱ्या हे ज्या प्रकारे चित्रीत करण्यात आलं ते आपण आपल्या समोरच हे सगळं पाहतो आहोत असं वाटेल इतकं अस्सल होतं. हा सिनेमा खरंतर दोन भागांमध्ये नव्हता.. मात्र हिंदी सिनेमा पाच तासांच्या तयार करण्याची आणि तसा तो पाहण्याची संस्कृती अजून आपल्याकडे रुळलेली नाही त्यामुळे सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. यातला मनोज वाजपेयी म्हणजेच सरदार खान, नवाजु्द्दीन सिद्दीकी म्हणजेच सिनेमातला फैजल खान या सगळ्यांनी केलेला अनुभव हा मोठ्या पडद्यावर पाहताना आपण एका पर्वणीचे साक्षीदार होत आहोत हेच सामान्य प्रेक्षकाला वाटलं. कुठलाही ग्लॅमर नसलेले चेहरे या सिनेमात वापरण्यात आले आणि अनुराग कश्यप हा कसला भन्नाट माणूस आहे हे सगळ्या जगाला कळलं. कारण या सिनेमाची चर्चा विविध चित्रपट महोत्सवांमध्येही झाली. २०१३ मध्ये झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाला पाच फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.

अग्ली सिनेमाने दाखवली माणसाची कुरुपता

अग्ली नावाचा एक सिनेमाही अनुरागने दिग्दर्शित केलाय या सिनेमात माणसाची कुरूपता किती हिडीस रुप घेऊ शकते हे ज्या पद्धतीने चितारण्यात आलं आहे ते खरंच मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासारखं आहे. अनुराग कश्यप हा असा दिग्दर्शक आहे जो गुडी-गुडी किंवा स्वप्नरंजन करणारे चित्रपट करत नाही. तो असे चित्रपट आणतो जे वास्तव दाखवतात, आपल्या मातीतले असतात. प्रेक्षकाला कधी अंतर्मुख करून जातात तर कधी त्याचं मन हेलावून टाकणारे ठरतात.

आयुष्यही वादग्रस्त

एकीकडे अनुराग हे वेगळ्या स्टाईलचे चित्रपट तयार करत होता आणि दुसरीकडे त्याच्या व्यक्तीगत आयुष्यातही बरीच उलथापालथ होत होती. अनुरागने सुरुवातीला आरती बजाजशी लग्न केलं होतं. मात्र या दोघांचं नातं संपुष्टात आलं. आरती बजाजशी त्याचे व्यावसायिक संबंध चांगले राहिले, मात्र आज एकमेकांच्या आयुष्यात ते एकमेकांना जवळचे राहू शकले नाहीत. अनुरागचे सूर अभिनेत्री कल्की कोचलिनशीही जुळले होते, दोघांनी लग्नही केलं होतं. मात्र हे नातंही अवघ्या तीन-चार वर्षांमध्ये संपुष्टात आलं.

वादग्रस्त दिग्दर्शकही ठरला अनुराग

अनुराग कश्यप हा जितका प्रसिद्ध यशस्वी दिग्दर्शक ठरला तितकाच तो वादग्रस्तही ठरला. अनुराग त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तो चर्चेत राहतो. सध्या त्याची चर्चा होते आहे ती हड्डी सिनेमाच्या निमित्ताने कारण या सिनेमात त्याने अभिनयही केला आहे. या आधी अकीरा आणि लक बाय चान्स या सिनेमांमध्येही त्याने कामं केली आहेत. अशात आता या सिनेमालाही प्रसिद्धी मिळते आहे.

आणि सेक्रेड गेम्समधला गणेश गायतोंडे अजरामर झाला

नेटफ्लिक्सवर आलेली सेक्रेड गेम्स ही वेबसीरिज अनुराग कश्यपने दिग्दर्शित केली होती. नवाजुद्दीन सिद्दीकीसारखा अभिनेता अभिनयाने सगळ्यांची मनं कशी जिंकू शकतो ते अनुरागने आपल्या यशस्वी दिग्दर्शनाने अनुराग कश्यपने दाखवून दिलं. अनुराग कश्यपच्या ब्लॅक फ्रायडे या सिनेमात नवाजुद्दीनने छोटीशी भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याचा गणेश गायतोंडे होण्यापर्यंतचा प्रवास हा प्रचंड खाचखळग्यांनी भरलेला होता. या सगळ्या प्रवासात नवाजला साथीला अनुराग कश्यप होताच.

सेक्रेड गेम्समध्ये गणेश गायतोंडेच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी. फोटो सौजन्य-ट्विटर

अनुरागने नवाज काय करू शकतो ते वासेपूरमधून दाखवून दिलंच होतं. मात्र गणेश गायतोंडे हा नवाजुद्दीनच्या आयुष्यातला मैलाचा दगड ठरला. कभी कभी लगता है अपुनही भगवान है असं म्हणणाऱ्या डॉनची कथा कसे विविध रंग उलगडत जाते, त्यात काय काय टप्पे येतात हे अनुराग कश्यपने आपलं सगळं कौशल्य पणाला लावून सादर केलंय. या सीरिजसाठी तर त्याला हॅट्स ऑफ!

एका मुलाखतीत अनुराग कश्यप म्हणाला होता की मी नास्तिक आहे आणि माझा फक्त एकच धर्म आहे तो म्हणजे सिनेमा. त्याच्या या वाक्याचा प्रत्यय त्याचे चित्रपट पाहिल्यावर नक्की येतो.