‘स्पायडरमॅन होमकमिंग’ या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवणारा अभिनेता टॉम हॉलंड सध्या ‘स्पायडरमॅन’च्या पुढील भागाच्या चित्रीकरणाची तयारी करतो आहे. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून पुढील भागाविषयी तो प्रचंड उत्साही असल्याचे दिसते. दरम्यान, त्याला चित्रपटाच्या पटकथेविषयी विचारले असता उत्तर देण्यास त्याने टाळाटाळ केली. परंतु, पुढील चित्रपटात ‘हल्क’ बरोबर काम करण्याची इच्छा दर्शवत कदाचित आता ‘हल्क’ आणि ‘स्पायडरमॅन’ यांची जुगलबंदी पाहायला मिळेल असे अप्रत्यक्षरीत्या टॉमने संकेत दिले आहेत. ‘माव्र्हल’च्या आजवरच्या सर्व सुपरहिरो पटांतील पटकथा याआधी आपण कॉमिक्समधून वाचलेल्या आहेत. त्याच कथांमध्ये थोडय़ाफार प्रमाणात बदल करून चित्रपटांतून त्या वापरल्या जातात. ‘स्पायडरमॅन होमकमिंग’मध्ये आपण स्पायडरमॅन व आयर्नमॅन यांची केमिस्ट्री पाहिली आहे. ‘अल्टिमेट स्पायडरमॅन’ कॉमिक्सच्या एका भागात हल्क आणि स्पायडरमॅन यांची मुलाखत होते. ‘हल्क’ हा स्वत:च्या मेंदूवर ताबा नसलेला सुपरहिरो आहे. तो कोणताही विचार न करता थेट स्पायडरमॅनवर हल्ला करतो. दोघांत झालेल्या जोरदार मारामारीमुळे आजुबाजूचा प्रदेश बेचिराख होण्यास सुरुवात होते. आणि मग नेहमीप्रमाणे मध्यस्तीसाठी आयर्नमॅनला पुढाकार घ्यावा लागतो. टॉमच्या मते ही कॉमिक कथा त्याच्या सर्वात आवडत्या कथांपैकी एक आहे. शिवाय त्याला हल्कबरोबर काम करायची इच्छा आहे आणि साहजिकच प्रेक्षकांनाही पडद्यावर ही जोडी पाहण्याची नक्कीच उत्सुकता आहे.
गॉडझिलाचे पुनरागमन