राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या निमित्ताने जाहीर केलेल्या ७५ रुपये तिकीट मोहिमेला देशभरातील प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २३ सप्टेंबरला देशभरातून ६५ लाख लोकांनी ७५ रुपये तिकिटात चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला. या वर्षभरातली ही विक्रमी प्रेक्षकसंख्या असल्याची माहिती ‘द मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने दिली आहे.

‘बहुपडदा चित्रपटगृह व्यावसायिकांनी एकत्र येऊन केलेल्या या मोहिमेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत आणि हिंदी-मराठी-दाक्षिणात्य असा कुठलाही भाषिक वा शैलीचा फरक न करता या सगळय़ाच चित्रपटांसाठी प्रेक्षकांनी आगाऊ तिकीट नोंदणी करत उत्तम प्रतिसाद दिला होता. प्रेक्षक चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत हे पुन्हा एकदा या प्रतिसादावरून सिद्ध झाले आहे,’ अशी भावना मूव्हीमॅक्स चित्रपटगृहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल साव्हनी यांनी दिली. तर प्रेक्षक चित्रपटगृहातच चित्रपट पाहण्यासाठी पसंती देत आले आहेत, यापुढेही हे प्राधान्य कायम असेल, हे या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादावरून लक्षात आले आहे. आम्हाला याचा विश्वास होताच, प्रेक्षकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून हा विश्वास सार्थ ठरवला आहे, अशी भावना पीव्हीआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्ता यांनी दिली आहे.

प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून सकाळी ६ वाजल्यापासून शो उपलब्ध करून देण्यात आले होते. अनेक ठिकाणी चित्रपटगृहांनी हाऊसफुल्ल गर्दी अनुभवली. या वर्षीचा २३ सप्टेंबर हा सर्वाधिक प्रेक्षकसंख्या अनुभवणारा दिवस ठरला, अशी माहिती ‘द मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने दिली आहे. देशभरातील महत्त्वाच्या बहुपडदा चित्रपटगृह समूहांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता, तब्बल ४ हजार सिनेमाच्या पडद्यांवर प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला.