अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरचा आगामी ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानावर आधारित हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता बच्चे कंपनीने मिळून या चित्रपटाच्या ट्रेलरवर एक गमतीशीर स्पूफ व्हिडिओ शूट केलाय. हा व्हिडिओ अक्षय कुमारच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आलाय.

विशेष म्हणजे या व्हिडिओला अक्षय कुमारने रिट्विट केल्यानंतर अल्पावधीतच सोशल मीडियावर तो व्हायरल झालाय. या व्हिडिओला रिट्विट करत खिलाडी कुमारने व्हिडिओ बनवणाऱ्या टीमचे आभार मानले आहेत. ‘हे जबरदस्त आहे. मुलांनी अप्रतिम काम केलंय. या व्हिडिओसाठी आणि तो शेअर केल्याबद्दल धन्यवाद,’ अशा शब्दांत अक्षयने  बच्चे कंपनीचे आभार मानले.

वाचा : ‘बिग बॉस’चे स्पर्धक ठरणार बिनपगारी फुल अधिकारी!

या व्हिडिओमध्ये ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’च्या मूळ ट्रेलरमधील आवाज वापरण्यात आला असून त्यावर लहान मुलांनी अभिनय केलंय. अक्षय सोबतच ‘वायकॉम १८’ आणि ‘मोशन पिक्चर्स’ने आपल्या अधिकृत युट्यूब पेजवर हा व्हिडिओ शेअर केलाय.

‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ चित्रपटात अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरसोबतच अनुपम खेर, दिव्येंद्रु शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. श्री नारायण सिंग दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.