हल्ली सोशल मीडियामुळे वाढत्या ट्रोलिंगला अनेक कलाकार वैतागले आहेत. अनेकदा त्यांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी, तर कधी कधी खासगी आयुष्यातील गोष्टींसाठीही ट्रोल केलं जातं. त्यांनी परिधान केलेले कपडे, त्यांचं काम सगळ्याचबद्दल प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत असतात. अशातच आता लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशीने याबद्दल सांगितलं आहे.
स्पृहा जोशी मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत नाटक, मालिका आणि सिनेमा अशा विविध माध्यमात काम केलं आहे. यासह तिला निवेदनाची आणि कवितांचीही आवड आहे. अभिनेत्रीचा स्वत:चा यूट्यूब चॅनेल असून त्यामार्फत ती वेगवेगळ्या कविता प्रेक्षकांना ऐकवत असते. तर सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी, कामासंदर्भातील माहिती देत असते, यादरम्यान काहीवेळा कपड्यांवरुन, ती काय खाते यावरुन तिला ट्रोल करण्यात आलेलं असं तिने सांगितलं आहे.
स्पृहाला एकदा तिच्या लूकवरुन मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. ते प्रकरण इतकं चर्चेत राहिलं होतं की वृत्तपत्रातही त्याविषयी बातमी आली होती असं तिने सांगितलं आहे. अशातच आता १० वर्षांपूर्वी झालेल्या या ट्रोलिंगबद्दल तिने सांगितलं आहे. स्पृहाने एक हॉल्टरनेक डिझाईनचा ब्लाऊज परिधान केल्यामुळे तिच्यावर टीका झाली होती. अभिनेत्रीने नुकतच अमुक तमूकला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगत तिने काय खायचं आणि काय परिधान करायचं याबद्दल अनोळखी लोकांनी बोललेलं तिला आवडत नाही असं म्हटलं आहे.
ट्रोलिंगबद्दल स्पृहा जोशी काय म्हणाली?
ट्रोलिंगबद्दल स्पृहा म्हणाली, “अनोळखी लोकांनी मला मी काय खायचं, काय कपडे घालायचे हे सांगितलेलं आवडत नाही. कपड्यांवरुन लोकांना बोलणं, हे असंच पाहिजे, तसंच पाहिजे. हे काय तुम्ही घातलंय हे बोलणं मला आवडत नाही. हा अधिकार मी फक्त माझ्या घरच्यांना दिलेला आहे. हे मला अजिबात अवडत नाही.”
हॉल्टरनेक ब्लाऊजमुळे झालेल्या ट्रोलिंगवर स्पृहाची संत्पत प्रतिक्रिया
हॉल्टरनेक ब्लाऊजमुळे झालेल्या ट्रोलिंगबद्दल स्पृहा म्हणाली, “मी खूपदा ट्रोल झाली आहे. दहा वर्षांपूर्वी एक फोटो टाकला होता. त्यामध्ये मी हॉल्टरनेकचा ब्लाऊज घातला होता. इतपत ट्रोलिंग झालं की त्याची बातमी पेपरमध्ये छापून आली. त्यात काहीच नव्हतं खरंतर. काही केलं असतं आणि ट्रोल केलं असतं तर मी समजून तरी घेतलं असतं.”
