Sreeleela Dances To Sanju Rathod’s Song : श्रीलीला दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम कलं आहे. अभिनेत्रीनं अनेक लोकप्रिय अभिनेत्यांसह आतापर्यंत स्क्रीन शेअर केली आहे. सध्या ती ‘उस्ताद भगत सिंह’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दाक्षिणात्य अभिनेता पवन कल्याण यामध्ये मुख्य भूमिकेत आहे.

श्रीलीला या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. अलीकडेच १९ मार्चला हा चित्रपट रिलीज झाला. श्रीलीला नेहमी कुठल्या न कठल्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी व्यावसायिक तर कधी खासगी आयुष्यामुळेही अभिनेत्री चर्चेचा विषय असते. श्रीलीला सोशल मीडियावरही सक्रिय असून तिचा तिथे मोठा चाहतावर्ग आहे. अशातच आता तिनं एक खास रील शेअर केली आहे, यामध्ये श्रीलीला मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे.

संजू राठोडच्या मराठी गाण्यावर थिरकली श्रीलीला

श्रीलीलानं एक रील शेअर केली असून यामध्ये ती लोकप्रिय गायक संजू राठोडच्या लोकप्रिय ‘शेकी शेकी’ या गाण्यावर रील बनवताना दिसत आहे. यावेळी तिनं भगव्या रंगाची पैठणी साडी नेसली असून मराठमोळा लूक केला आहे. नऊवारी साडीत श्रीलीला खूप सुंदर दिसत आहे. मोकळे केस, दागिने आणि कपाळावर चंद्रकोर अस तिचा लूक आहे. यावेळी तिनं नथसुद्धा परिधान केली आहे.

Award Banner

संजू राठोड काय म्हणाला?

श्रीलीलानं या व्हिडीओला ‘मराठी मुलगी एनर्जी’ अशी कॅप्शन दिली आहे. तिच्या चाहत्यांनी या रीलवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे, तर स्वत: संजू राठोडनं देखील तिच्या या रीलवर कमेंट केली आहे. त्यानं ‘हेय किती सुंदर’ असं लिहिलं आहे. श्रीलीलानं काही दिवसांपूर्वी तांबडी चांबडी या लोकप्रिय रॅप साँगवरही रील बनवली होती, तेव्हासुद्धा अभिनेत्रीची ही रील प्रचंड व्हायरल झाली होती.

संजू राठोडबद्दल बोलायचं झालं तर संजू आणि त्याची गाणी सध्या खूप चर्चेत आहेत. गायकानं त्याच्या हटके स्टाईलनं आतापर्यंत अनेकांना अक्षरश: वेड लावलं आहे. त्याची गाणी, त्यातील शब्द, डान्सच्या स्टेप्स हे सगळं लक्षवेधी असतं. संजू राठोडनं आतापर्यंत अनेक हिट गाणी दिली आहेत. पण, तो प्रसिद्धीझोतात आला ते त्याच्या ‘गुलाबी साडी’ या गाण्यामुळे. हे गाणं जगभरात गाजलं होतं.

दरम्यान, श्रीलीलानं ही रील शेअर केली असून यामध्ये ती व्हॅनिटी रूममध्ये असल्याचं दिसतं, त्यामुळे तिचा हा मराठमोळा लूक कुठल्या नवीन प्रॉजेक्टचा भाग आहे का? हा लूक तिनं चित्रपटासाठी केलाय का? तसंच येत्या काळात अभिनेत्री मराठी मुलीच्या भूमिकेत झळकणार आहे का? असे प्रश्नही निर्माण झाले आहेत. परंतु, ही फक्त रील आहे की खरंच श्रीलीलाचं नवीन प्रॉजेक्ट आहे, याचं उत्तर येत्या काळातच मिळेल.